डोंबिवलीत दिसले दुर्मीळ 'इजिप्शिअन गिधाड'

30 Dec 2020 13:09:06
vulture_1  H x

छायाचित्र टिपण्यात पक्षीनिरीक्षकांना यश 

मुंबई (अक्षय मांडवकर) - कल्याण डोंबिलीमध्ये पक्षीनिरीक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या हाजी-मलंग परिसरातून दुर्मीळ 'इजिप्शिअन गिधाडा'ची (पांढरे गिधाड) नोंद करण्यात आली आहे. बुधवारी पक्षीनिरीक्षणादरम्यान हौशी पक्षीनिरीक्षकांना हा पक्षी आढळून आला. शिकारी पक्ष्यांसाठी हाजी-मलंग हा परिसर उत्कृष्ट अधिवास आहे. 
 
महाराष्ट्रातून गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद असली, तरी ‘पांढऱ्या पुठ्ठ्याची’, ‘लांब चोचीची’ आणि ‘पांढरी गिधाडे’ १९९० आणि त्यापूर्वी मोठय़ा संख्येने आढळत होती. देशभरात गिधाडांची संख्या देशभरात कोलमडल्यानंतर अपुऱ्या खाद्यपुरवठय़ामुळे राज्यात आढळणारी गिधाडे सुद्धा दिसेनाशी झाली. त्यामुळे त्यांचा समावेश ‘नष्टप्राय श्रेणी’तील पक्ष्यांच्या यादीत करण्यात आला. कोकण किनारपट्टीदरम्यान गिधाडांचा अधिवास असून प्रामुख्याने रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने गिधाडे आढळतात. मात्र, मुंबई महानगर परिक्षेत्रातही अधूनमधून गिधाडांचे दर्शन होत असते. डोंबिवलीतील हौशी पक्षीनिरीक्षक मनीष केरकर यांना बुधवारी पक्षीनिरीक्षणादरम्यान दुर्मीळ 'इजिप्शिअन गिधाडा'चे दर्शन झाले आहे. 
 
 
हाजी-मलंग परिसरात पक्षीनिरीक्षण करताना यापूर्वीही आकाशात उडणाऱ्या गिधाडांचे दर्शन आम्हाला झाले होते. मात्र, बुधवारी मलंग रस्त्यावरील खारड जवळ प्रौढ 'इजिप्शिअन गिधाडा'चे छायाचित्र टिपण्यात यश मिळाल्याचे केरकर यांनी सांगितले. हाजी-मलंगची डोंगररांग ही गिधाडांसारख्या शिकारी पक्ष्यांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी या परिसरातून इम्पेरियल इगल, पाईड हॅरिअर, रुफस बेलिड इगल आणि ससाणा जातीमधील शिकारी पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. 'इजिप्शिअन गिधाड' हे दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशिया खंडात आढळते. या गिधाडाच्या तीन उपप्रजाती आहेत. भारतीय उपखंडात या तिघांपैकी सर्वात लहान आकाराची प्रजात आढळते. तिची चोच पिवळी असते. 

Powered By Sangraha 9.0