कोकण किनारपट्टीवर 'किटिवेक' समुद्रपक्ष्याचे दुर्मीळ दर्शन

03 Dec 2020 14:22:33

bird watching_1 &nbs


'काळ्या पायाचा किटिवेक' पक्ष्याची महाराष्ट्रातील तिसरी नोंद

मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्रातूून 'काळ्या पायाचा किटिवेक' (Black-legged Kittiwake) या समुद्रपक्ष्याची दुर्मीळ नोंद करण्यात आली आहे. अलिबागच्या आक्षी समुद्रकिनाऱ्यावर पक्षीनिरीक्षकांना हा पक्षी आढळून आला. या समुद्रपक्ष्याची महाराष्ट्रातील ही तिसरी नोंद आहे, तर भारतात आजवर केवळ सात ते आठ वेळाच हा पक्षी आढळून आला आहे.
 
 
 
खोल समुद्रात वास्तव्य करुन फार क्वचितच भूपृष्ठावर दिसणारे काही समुद्रपक्षी गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात आढळले आहेत. यामध्ये मास्कड् बूबी, ब्राऊन बूबी यासांरख्या समुद्री पक्ष्यांचा समावेश आहे. आता यामध्ये आणखी एका दुर्मीळ समुद्रीपक्ष्यांची भर पडली आहे. हौशी पक्षीनिरीक्षक असलेले अलोक भावे यांना ३० नोव्हेंबर रोजी आक्षी किनाऱ्यावर 'काळ्या पायाचा किटिवेक'चे दर्शन घडले. पक्षीनिरीक्षक प्रज्ञावंत माने आणि रितेश बागुल यांच्यासमेवत पक्षीनिरीक्षण करत असताना सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा पक्ष्यांचे दर्शन आम्हाला घडल्याची माहिती भावे यांनी दिली. माने यांनी पक्ष्याची ओळख पटविल्यानंतर महाराष्ट्रातील या पक्ष्याची ही तिसरीच नोंद असल्याचे समोर आल्याचे त्यांनी सांगितले. 
 
पक्षीनिरीक्षक - अलोक भावे
bird watching_1 &nbs
 
यापूर्वी २०१२ साली सिद्धेश ब्राम्हणकर यांना 'काळ्या पायाचा किटिवेक' हा पक्षी अलिबागच्या किनाऱ्यावर दिसला होता. या पक्ष्याची ती महाराष्ट्रातील पहिलीच नोंद होती. त्यानंतर प्रमोद जिरापूरे यांना यवतमाळच्या बोरगाव धरणामध्ये या पक्ष्याचे दर्शन घडले होते. 'इ-बर्ड' या संकेतस्थळानुसार भारतात गोवा, केरळ आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर हा पक्षी दिसल्याच्या दुर्मीळ नोंदी आहेत. 'काळ्या पायाचा किटिवेक' हा 'कुरव' कुळातील पक्षी आहे. हा पक्षी कॅनडा ते ग्रीनलँड तसेच अलास्का ते सायबेरियाच्या किनाऱ्यापर्यंत पॅसिफिक समुद्राच्या बाजूला आणि अटलांटिकच्या उत्तरेकडील सर्व प्रदेशात आढळतो. या पक्ष्याच्या हिवाळी स्थलांतराची सीमा सेंट-लॉरेन्सपासून दक्षिणेपासन न्यू जर्सीच्या दक्षिणेकडील किनाऱ्यापर्यंत आहे. तसेच चीन, सारगासो समुद्र आणि पश्चिम आफ्रिकेच्या किनारपट्टीपर्यंतही तो आढळतो.
 
 
Powered By Sangraha 9.0