देशात नव्या ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव

29 Dec 2020 20:59:59
corona_1  H x W
 
 

नवी दिल्ली : नववर्षात लसीकरणाला प्रारंभ झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच देशात नव्या कोरोनाचा विषाणू आढळल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. ब्रिटनवरून भारतात परतलेल्या सहा प्रवाशांच्या शरीरात कोरोना विषाणूचा नवा प्रकार (स्ट्रेन) आढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याविषयी माहिती दिली आहे. भीतीचे कारण नसल्याचेही यावेळी केंद्रीय मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, नवा विषाणू आढळून आल्यानंतर ब्रिटनसह युरोपीय देशांकडून करण्यात आलेले पुन्हा ‘लॉकडाऊन’ आणि अन्य निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.
 
 
भारतात परतलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधित आढळलेल्यांच्या नमुन्यांची ’जिनोम सिक्वेंसिंग’ करण्यात आली होती. या दरम्यान बंगळुरुतील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्स’च्या प्रयोगशाळेत तीन, हैदराबाद येथील सीसीएमबीत दोन, पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत एका नमुन्यात कोरोनाचे नवीन विषाणू आढळल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली.
 
 
नवीन स्ट्रेनच्या फैलावासंबंधी माहिती मिळवण्यासाठी २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान भारतात ९ लाख, ३५ हजार कोरोनाबाधित आढळलेल्यांपैकी पाच टक्के नमुन्यांचे जिनोम सिक्वेंसिंग केली जात आहे. येत्या काही दिवसांत नवीन स्ट्रेनग्रस्त रुग्णांची माहिती मिळेल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे. दिल्लीत ब्रिटनवरून येणार्‍यांपैकी आतापर्यंत १९ प्रवाशांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. आतापर्यंत ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाचे नवे स्वरूप डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनान, तसेच सिंगापूर नंतर भारतात आढळला आहे.
 
 
भारतातीतल विविध विमानतळांवर २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२० च्या मध्यरात्री दरम्यान सुमारे ३३ हजार प्रवासी उतरले. या सर्व प्रवाशांचा मागोवा राज्य व केंद्रशासित प्रदेशांकडून ‘आरटीपीसीआर’ चाचणी आधारे घेतला आहे. आतापर्यंत केवळ ११४ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. हे सकारात्मक नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी १० ‘आयएनएसएसीओजी’ प्रयोगशाळांकडे पाठविण्यात आले आहेत. यासह देशातील प्रत्येक राज्यात ब्रिटनवरून येणार्‍या प्रवाशांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेसिंग करीत पाठवले जात आहेत.



Powered By Sangraha 9.0