
०१ जानेवारीपासून टोलमध्ये सूट
पनवेल: स्थानिकांनी वारंवार मागणी करूनसुद्धा टोलमध्ये सुट न दिल्याने आ.प्रशांत ठाकूर यांनी आज दि.२८ डिसेंबर रोजी धडक मोर्चाचा दणका देत आयआरबी टोलनाका प्रशासनाला वठणीवर आणले. या दणक्याने टोलनाका प्रशासनाने ०१ जानेवारी २०२१ पासून टोलमध्ये सुट देण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धडक मोर्चाला मिळालेल्या यशाबद्दल सर्व आंदोलकांनी टाळ्यांचा गजर करून आभार व्यक्त केले.
पनवेल तालुक्यातील किरवली येथे असलेल्या शिळफाटा टोलनाक्यातून स्थानिक ट्रान्सपोर्टच्या छोट्या-मोठ्या वाहनांना सूट दिली जात नाही. त्यामुळे त्रिमूर्ती चालक मालक संघटनेच्या माध्यमातून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज, सोमवार दि.२८ किरवली (रोहींजण) टोलनाका प्रशासनाच्या विरोधात धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाची तीव्रता पाहून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुद्धा होता.
त्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी यावेळी बोलताना म्हंटले कि, स्थानिक भूमिपुत्र म्हणून आंदोलन आपल्याला नवीन नाही. सिडको, एमआयडीसी, कॉरिडोर अशा विरोधात अनेक आंदोलने आपण केली आहेत. भूमिपुत्र म्हणून स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे हि भूमिका कायम राहिली आहे. जमिनी प्रकल्पांना संपादित झाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. तो सोडवण्यासाठी छोटे-मोठे उद्योगधंदे केले जातात. तसेच काही स्थानिक टेम्पोच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत; असे असताना स्थानिक म्हणून त्यांना टोलमध्ये सूट देणे क्रमप्राप्त असूनही ती सवलत दिली जात नसल्याने आ.प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले गेले.

"या महामार्गाला सर्व्हिस रोड नसल्याने साहजिकच स्थानिकांना याच मार्गावरून वाहतूक करावे लागते. येत्या काळात या मार्गाचे रुंदीकरण होऊन सर्व्हीस रोड मिळेल पण तो पर्यंत याच मार्गाचा उपयोग केला जाणार त्यामुळे स्थानिकांच्या वाहतूक वाहनांना सूट प्राधान्याने मिळाली पाहिजे. आयआरबी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत टोल सूटचा प्रश्न मार्गी लागला आहे, त्यानुसार स्थानिकांच्या माल वाहतूक वाहनांना सूट मिळणार आहे. मात्र प्रशासनाने माघार घेतल्यास तीव्र आंदोलन करू. या टोल नाक्यावरील कमर्चाऱ्यांना किमान वेतन लागू करावा हि मागणी केली आहे. आरबीआय या बाबतीत सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे" - आमदार प्रशांत ठाकूर
या आंदोलनाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक हरीश केणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, चाहुशेठ पाटील, गोपीनाथ पाटील, विनोद पाटील, रोहिदास पाटील, मोतीलाल कोळी, संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.