‘ईडी’ची पीडा राऊतांच्या मागे !

27 Dec 2020 19:55:18
sanjay raut_1  
 
 


‘पीएमसी’ बँक गैरव्यवहार प्रकरणात वर्षा राऊत यांना समन्स

 
 
 
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह कुटुबियांची होणारी चौकशी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना गैरव्यवहाराबाबत नोटीस आदी मुद्दे सर्वत्र चर्चेत असतानाच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही समन्स बजावले असल्याचे वृत्त रविवारी, दि. 27 डिसेंबर रोजी प्रसिद्धीमाध्यमांवर झळकल्यानंतर राजकीय वातावरण आणखीन तप्त झाले.
 
 
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले असून येत्या मंगळवारी, दि. 29 डिसेंबर रोजी त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही नोटीस बजावल्याचे समजते. कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली असून वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेली माहिती आहे.
 
 
या अगोदर महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलेले आहे. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केलेली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, संजय राऊत नेमकी कशी भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
 
 
नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी बुधवारी, दि. 30 डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. अद्याप तरी संजय राऊत किंवा वर्षा राऊत यांच्याकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0