‘कोरोना’ हा शेवटचा आजार नाही : WHO

    27-Dec-2020
Total Views |
who_1  H x W: 0




जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांचा इशारा

 
 
जिनिव्हा : संपूर्ण जगभरात थैमान माजवणार्‍या कोरोना या महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना सुरु असतानाच जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस घेब्रायस यांनी एक वेगळाच इशारा दिला.


कोरोना महासाथीचा आजार हा शेवटचा आजार नाही. पुढेही आपल्याला काळजी बाळगणे गरजेचे असल्याचे सांगत हवामान बदल रोखणे आणि पशू कल्याण केल्याशिवाय मानवी आरोग्य सेवा सुधारण्याचे प्रयत्न व्यर्थ असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी यावेळी बोट ठेवले. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहेत. मात्र, कोणताही देश पुढील महासाथीचा आजार रोखण्यास समर्थ नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
टेड्रोस यांनी म्हटले की, “कोरोना महासाथीच्या आजारापासून शिकण्याची ही वेळ आहे. दीर्घकाळापासून जगाने भय आणि उपेक्षांच्या चक्रात काम केले आहे. महासाथीचा आजार पसरला की आपण मोठ्या प्रमाणावर खर्च करतो. आजार संपल्यानंतर आपण त्या संकटाला विसरतो आणि पुढील महासाथीचा आजार रोखण्यासाठी काहीच करत नाही. अशा पद्धतीने विचार करणे धोकादायक आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
 
 
दरम्यान, कोरोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, रशियामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या प्रकाराने आणखी चिंता वाढवली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचा नवा विषाणू हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुढील वर्षी कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती असून रुग्णालयांत जागा कमी पडेल, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या वाढण्याचा धोका आहे.
 
 
 
एका अहवालानुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अ‍ॅण्ड ट्रॉपीकल मेडिसीनच्या सेंटर फॉर मॅथमॅटिकल मॉडलिंग ऑफ इन्फेक्शियस डिसीजने याबाबत एक संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, कोरोनाचा नवा विषाणू हा इतर विषाणूंच्या तुलनेत ५६ टक्के अधिक संसर्गजन्य आहे.