स्वप्न ते न लोचनी

27 Dec 2020 18:45:32

O henry_1  H x
 
 
दुकाने बंद होण्याची वेळ जवळ आली होती. रस्ते रोजच्या सारखेच गर्दीने फुलून गेले होते. रस्त्याच्या कडेला ‘नोम’ या सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातून एक दिवसाच्या सुट्टीसाठी आलेला हेन्री नावाचा तरुण उभा होता. उद्या सकाळी त्याला परत निघायचे होते. हेन्रीने तीन वर्षे सोन्याच्या खाणीत काम केले होते. आजवर अंगावर वागवलेली खाणीतली धूळ हजारभर औंस नक्की असेल. पण, त्या धुळीचा त्याच्या केसांच्या सोनेरी रंगाशी संबंध नव्हता. उलट नोममधल्या उन्हाने त्याची सोनेरी कांती तांबूस तपकिरी पडली होती.
सिक्स्थ अव्हेन्यूवरील सिबर-मेसन मार्ट बंद झाले आणि त्याच्या दारातून सेविका, विक्रेत्या, रोखपाल वगैरे मुलींचा लोंढा एकदम बाहेर पडला. रोखपाल म्हणून काम करणारी मिस क्लेरिबल कोल्बी त्या लोंढ्यातला केवळ एक ठिपका होती. ठिपकादेखील सामान्य, नजरेत न भरण्याजोगा होता. लोंढ्यातल्या असंख्य देखण्या तरुणींकडे न बघता हेन्रीने नेमके तिला पाहिले आणि नोमवासीयांच्या धांदलबाज परंपरेनुसार तिच्या प्रेमात पडला. घाईने प्रेमात पडला ते ठीक. पण, उद्याच परत जायचे म्हटल्यावर तिच्याशी ओळख काढणे, तिला मागणी घालणे, या गोष्टीदेखील ताबडतोब करणे आवश्यक होते. संध्याकाळची आणि गर्दीची वेळ असल्याने ती झपाझप चालत होती. तोही तिच्या मागे धावला. ती फेरी स्टेशनवर पोहोचली. परतीची बोट सुटण्याच्या बेतात होती. तिने तिकीट काढून बोट पकडली, तेव्हा त्यानेही तिकीट काढले होते आणि दोघांमधले दहा यार्ड अंतर तीन लांब उड्यांमध्ये गाठून धापा टाकीत बोटीत शिरून तिच्या समोर येऊन ठाकला.
मिस क्लेरिबल हे एक खिन्नमनस्क प्रकरण होते. तिला एकही मित्र नव्हता. तिच्या बरोबरच्या मुली सुट्टीच्या वारी डेटिंगला जात, तेव्हा ती आपल्या खोलीत रेडिओ ऐकत किंवा एखादे पुस्तक वाचत पडून राही. एखाद्या ग्राहकाने बिलाचे पैसे देताना ‘कीप द चेंज’ म्हणून टीप दिली, तर आभार मानतानादेखील तिला स्मितहास्य करणे जमत नसे. आज ती खूपच थकली होती. तिने वरच्या डेकवरची कोपर्‍यातली जागा पकडून डोके मागच्या कोपर्‍यावर टेकले होते. तेवढ्यात या हेन्रीने येऊन शांतताभंग केला. “लेडी, तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल क्षमा करा, मघाशी मी तुम्हाला बघितलं...”
“देवा, या आगंतुकांना टाळण्याचा काही मार्ग नाही का? संध्याकाळी कोणाची कटकट नको म्हणून दुपारच्या लंचमध्ये मी आवर्जून कांदा आणि लसूण खात असते! निघा तुम्ही, मित्रवर्य.”
पण, तो नाउमेद झाला नाही. “मी, त्यातला नाही. खरोखरच नाही. मी, तुम्हाला पाहिलं आणि लगेच प्रेमात पडलो. आम्ही नोमवासी आयुष्यातले सगळे निर्णय असे झट की पट घेतो. मी, गेली तीन वर्षे सोन्याच्या खाणीत काम केलंय आणि उद्या परत निघालोय.”
तिने त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकला. हा नेहमीचा गुलछबू दिसत नव्हता. भलतेच शामळू प्रकरण होते. तिने त्याला शेजारी बसण्याची खूण केली नि म्हणाली, “काय ते झटपट बोला. वेडंवाकडं वागलात तर मी ओरडून स्टीवर्डला बोलावीन.”
तिच्या शेजारी बसून त्याने उत्साहाने तिची स्तुती केली. तीच त्याच्या आयुष्यात आलेली पहिली युवती आहे, यापूर्वी तो असा कधी कुणाच्या प्रेमात पडला नव्हता. आपला परिचय दिला. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या. मोठ्या मुश्किलीने ती डोळे उघडे ठेवीत होती. त्याने एका कागदावर स्वतःचं नाव-पत्ता लिहून तिला देत म्हणाला, “मला होकार द्यावासा वाटला तर हा कागद आहे. तीन वर्षांच्या नोकरीत मी साधा राहिलो. भरपूर बचत केली.”
“उरलेले पैसे मी ठेवून घेऊ?” तिने हातातला कागद घट्ट धरून झोपेत विचारले.
“माझं जे जे आहे, ते सगळं ठेवून घ्या.”
तिचे डोळे मिटले, मान कलली आणि डोके त्याच्या खांद्यावर रुळले. गोड गोड निद्रेने तिचा ताबा घेतला होता. ओठ किंचित विलग झाले आणि ती नाजूक आवाजात घोरायला लागली. तिच्या स्पर्शाने तो शहारला. पण, सभ्यपणे अंग चोरून बसला.
मिस क्लेरिबलला झोपेत त्याचे बोलणे ऐकू येत होते, “पैसा पैसा काय, भरपूर कमावला आहे. पण, आपल्याला आवडलेल्या माणसाचं प्रेम, सहवास लाभणं केव्हाही बेहतर. तुम्हाला काय वाटतं? प्रेम श्रेष्ठ की पैसा?”
अचानक मिस क्लेरिबलच्या मिटलेल्या डोळ्यांसमोर दुकानातलं दृश्य आलं. ग्राहकाने घेतलेल्या वस्तूंची यादी करून तिने खणखणीत आवाजात फर्मावले, “कॅश, प्लीज.”
आणि मानेला हिसका बसून ती जागी झाली. स्टेशन आलं होतं. बोट रिकामी होत आली होती. शेजारचा तरुण उठून गेला होता. ती घाईघाईने बोटीतून उतरली आणि रस्त्यावर आली. तिला वाटलं की आपल्या हातातली त्याच्या नावपत्त्याची चिठ्ठी बोटीतच पडली असावी. किंवा आपल्याला हे सगळं स्वप्न पडलं असावं. आपल्या कोणी प्रेमात पडावं एवढं कुठलं आपलं भाग्य?
- विजय तरवडे
(‘द फेरी ऑफ अनफुलफिलमेंट’ या कथेवर आधारित)
Powered By Sangraha 9.0