ब्रिटनहून परतलेल्या महिलेची कोविड चाचणी पॉझिटीव्ह

26 Dec 2020 17:29:05

KDMC_1  H x W:
कल्याण : ब्रिटनहून कल्याण-डोंबिवलीत परतलेल्या एक महिलेची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आता तिचा अहवाल मुंबईनंतर पुण्याला पाठविण्यात येणार आहे. या महिलेमध्ये कोणतीच लक्षणे दिसून येत नसून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. या महिलेचा पुण्यामधील अहवाल आता काय येतो? याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास कल्याण-डोंबिवलीकरांबरोबर इतर शहराची ही चिंता वाढण्याची शक्यता आहे.
 
 
 
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाच्या प्रकारामुळे अतिदक्षतेचा उपाय म्हणून तिकडून कल्याण-डोंबिवलीत परतल्यांची महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे कोविड चाचणी करण्यात आली. त्यामध्ये वीस नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या महिलेला आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ब्रिटनहून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालवधीत कल्याण-डोंबिवलीत आलेल्या ५५ जणांची यादी महापालिकेस सरकारने दिली होती. पण या यादीत काही नावे दोनदा होती. तर काही नावे कल्याण-डोंबिवली महापालिका परिसराच्या बाहेरील होते.
 
 
 
महापालिकेने ४५ जणांचे सव्रेक्षण केले. या ४५ जणांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. यातील ७ जणांची चाचणी नेगिटिव्ह आली असली तरी एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने महापालिकेसह येथील स्थानिक नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तिचा चाचणी अहवाल मुंबईतील एनआयव्हीला पाठविला गेला. त्याठिकाणी तिचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. आता हा चाचणी अहवाल पुण्यातील एनआयव्हीला (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी) पाठविला गेला आहे. तिचा कोविड चाचणी अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीकरिता पुण्याला पाठविण्यात आला आहे.
 
 
 
कोविड चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेली तरूणी ही १९ वर्षीय आहे. तिच्यात इतर कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडू नका, घराबाहेर कामानिमित्त बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. काही लक्षणो आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्रात जाण्याचे आवाहान महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0