टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पार्थो दासगुप्ता यांना अटक

25 Dec 2020 17:43:48
trp_1  H x W: 0




पार्थो दासगुप्ता हाच मास्टरमाइंड: मुंबई पोलीस



मुंबई: बार्कचा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड तोच असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने गुरुवार दि. २४ डिसेंबर रोजी रायगड येथून अटक केली. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पत्रकार परिषदेत दासगुप्ता हाच टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड असल्याची माहिती दिली. पत्रकार अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक भारत हिंदी आणि रिपब्लिक टीव्ही या इंग्रजी वाहिनीचा टीआरपी कृत्रिमरित्या वाढवल्याच्या घोटाळ्यात दासगुप्ताचा सहभाग असल्याचा आरोप आहे.


मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने बार्कचा माजी अधिकारी रोमिल रामगढिया याला अटक केली होती. सहायक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर आणि सचिन वाझे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. पोलिसांनी त्याचा मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केला होता. रामगढिया आणि अन्य आरोपींची चौकशी केली जात असून, त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे काल, गुरुवारी मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने रायगड येथून दासगुप्ताला अटक केली. आज शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी त्याला न्यायालयात देखी;ल हजार केले व तेव्हाच त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



टीआरपी घोटाळ्यात आतापर्यंत विविध वाहिन्या, हंसा कंपनी आणि बार्कचे माजी अधिकारी सामील आहेत, असे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात अटक केलेल्या व्यक्तींची संख्या आता १५ वर गेली आहे. यासंबंधी विशेष पथकाकडून यापुढेही तपास सुरू राहणार असून, आणखी मोठी नावे समोर येण्याचीसुद्धा शक्यता व्यक्त केली जात आहे.



Powered By Sangraha 9.0