एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

24 Dec 2020 12:46:57

elgar parishad_1 &nb


पुणे :
जवळपास तीन वर्षांपूर्वी कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या दंगलीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप असणार्‍या एल्गार परिषदेचे पुन्हा एकदा पुणे शहरात आयोजन करण्यात येत आहे.येत्या दि. ३१ डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी स्वारगेट पोलिसांकडे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्यावतीने परवानगीसाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नाकारली असल्याची माहिती आहे. याबाबत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले की, “एल्गार परिषद हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला अकारण बदनाम केले गेले आहे. कोरेगाव-भीमा येथे दरवर्षी देशभरातून हजारो कार्यकर्ते येत असतात. ही परिषद मानवभेद सोडून जात, धर्म, पंथ राजकीय भेद सोडून सांस्कृतिक जागर करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.


साने गुरुजी स्मारक येथे दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात येत्या दि. 31 डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे एल्गार परिषद घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आम्ही गणेश कला क्रीडा मंचचे आरक्षण केले आहे. या परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे. राज्यात कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेला परवानगी द्यायची की नाही, याचा निर्णय राज्यस्तरावरच घेतला जाईल, असे प्रशासन तर्फे सांगण्यात आले.


कोरेगाव-भीमा येथे दि. ३१ डिसेंबर, २०१७ रोजी मोठी दंगल झाली होती. त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले होते. या परिषदेच्या आयोजनामध्ये बंदी असलेल्या शहरी माओवादी संघटनांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषदेचा तपासाचा आढावा घेण्याची सूचना केल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने पुणे पोलिसांकडील हा तपास ‘एनआयए’कडे सोपविला आहे.
Powered By Sangraha 9.0