बांद्यातील डाॅ. पाटकरांनी खासगी बागायतीला दिला 'शेकरू राखीव क्षेत्रा'चा दर्जा

24 Dec 2020 19:08:58

Indian giant squirrel_1&n

शिकाऱ्यांपासून शेकरूचे रक्षण करण्यासाठी निर्णय 

मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावात एका मानसोपचारतज्ज्ञांनी महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेल्या 'शेकरू'साठी आपली खासगी लागवडीखाली असलेली जमीन राखीव ठेवली आहे. गावातील शिकाऱ्यांपासून शेकरूच्या रक्षणासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. शिकाऱ्यांना समज देण्यासाठी डाॅक्टरांनी आपल्या जागेभोवती 'शेकरू राखीव क्षेत्रा'चा फलक लावला आहे. 
 
 
महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवर बांदा हे छोटेसे गाव वसले आहे. या गावातील गवळीटेंबमध्ये डाॅ. रुपेश पाटकर राहतात. व्यवसायाने ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. गोव्यामध्ये कार्यरत असलेले डाॅ. पाटकर सकाळी गोव्याला जाऊन संध्याकाळी पुन्हा महाराष्ट्रात परतात. गवळीटेंबमध्येच त्यांची ८ एकरावर नारळाची बागायती आहे. या बागायतीमध्ये गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून शेकरूचा अधिवास आहे. शेकरूच्या दोन जोड्या या बागयतीमध्ये गुण्यागोविंदाने नांदतात. या आठ एकराच्या बागायतीला डाॅ. पाटकरांनी आता 'शेकरू राखीव क्षेत्र' म्हणून आरक्षित केले आहे.

Indian giant squirrel,_1& 
 
आपल्या खासगी जमिनीला 'शेकरू राखीव क्षेत्र' म्हणून आरक्षित करण्याविषयी डाॅ. पाटकर यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'ला सांगितले की, "काही दिवसांपूर्वी लोक बंदूक घेऊन बागायतीच्या कंपाऊंडच्या बाहेरून शेकरू मारण्याचा प्रयत्न करत होती. शेकरू मारण्यासाठी आलेल्यांनी आणि गावातील लोकांनीही असे गृहीत धरले होते की, आमची या प्रकाराला मूक संमती आहे. परंतु, हा प्रकार रोखण्यासाठी आम्ही आमच्या खासगी क्षेत्राला 'शेकरू राखीव क्षेत्र' म्ह्णून आरक्षित केले आणि तसा फलकच त्याठिकाणी लावला आहे". डाॅक्टरांनी लावलेल्या फलकावर राज्य प्राणी, शेकरूची हत्या केल्यास भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअन्वये शिक्षा होऊ शकते. तसेच शिकारीच्या हेतूने रानडुक्कर मारणे कायद्याने गुन्हा आहे, असा आशय लिहला आहे. आजबाजूचा निसर्ग वाचावा आणि अन्नसाखळीचे संरक्षण व्हावे, या हेतूने आम्ही हे काम केल्याचे डाॅ. पाटकर यांनी सांगितले. अशा प्रकारचा निर्णय घेऊन डाॅ. पाटकरांनी समाजात वन्यजीव संवर्धनासाठीचा एक आदर्श घालून दिला आहे. 
 
Powered By Sangraha 9.0