नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही : केंद्रीय आरोग्यमंत्री

22 Dec 2020 12:27:46
Harsh Vardhan_1 &nbs


नवी दिल्ली : "कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपास देशवासीयांनी घाबरण्याची गरज नाही," असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी स्पष्ट केले. ते म्हणाले, "बदलत्या परिस्थितीविषयी केंद्र सरकार पूर्णपणे सतर्क आहे. गेल्या वर्षभरापासून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केंद्र सरकार करीत असून यापुढेही करीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भयभीत होण्याची गरज नाही," असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 
देशात ‘कोरोना’ रुग्ण बरे होण्याचा दर ९५.५३ टक्के

भारतातील सक्रिय कोविडबाधितांच्या संख्येत घसरण होत असून सध्य स्थितीला देशात तीन लाखांपेक्षा कमी रुग्ण बाधित आहेत. गेल्या १६१ दिवसांच्या कालावधीनंतर प्रथमच रुग्णसंख्येने आज नीचांक गाठला आहे. याआधी, गेल्या १३ जुलै रोजी ३ लाख, १ हजार, ६०९ सक्रिय कोविड रुग्णांची नोंद झाली होती. भारतात सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या देशाच्या एकूण कोविडबाधित रुग्णसंख्येच्या फक्त ३.०२ टक्के इतकी आहे. नव्याने बर्‍या झालेल्या रुग्णांमुळे एकूण सक्रिय कोविडबाधितांच्या संख्येत १,७०५ ने घट झाली आहे.
देशात नव्याने कोविडमुक्त होणार्‍या व्यक्तींची संख्या गेले २४ दिवस सातत्याने रोज नोंदविल्या जाणार्‍या कोविडबाधितांपेक्षा कमी आहे. देशात गेल्या २४ तासांच्या कालावधीत २४ हजार, ३३७ नव्या कोविड बाधितांची नोंद झाली, या कालावधीत २५ हजार, ७०९ जणांना रोगमुक्त झाल्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. अधिकाधिक व्यक्ती कोविड संसर्गातून बर्‍या होत असल्याने रोगमुक्तीचा दर ९५.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या आता ९६ लाख, ०६ हजार, १११ झाली आहे.
 
ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे. रोगमुक्त होणारे आणि नव्याने बाधित यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस वेगाने वाढत असून सध्या ही तफावत ९३ लाख, ०२ हजार, ४७२ इतकी आहे. देशभरात गेल्या २४ तासांत ३३३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ८१.३८ टक्के रुग्ण देशातील दहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील होते. महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे ९८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर पश्चिम बंगालमध्ये ४० रुग्ण आणि केरळमध्ये ३० रुग्ण मृत्युमुखी पडले. आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार करता, कोविडमुळे जीव गमावणार्‍या रुग्णांची संख्या कमी असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. सध्या भारतात हे प्रमाण १०५.७ प्रतिदशलक्ष इतके आहे.
Powered By Sangraha 9.0