आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्हमध्ये दुर्मीळ 'लाजवंती'चे दर्शन

21 Dec 2020 15:31:08
slender loris _1 &nb


'लाजवंती' हा माकड कुळातील एक दुर्मीळ प्राणी 

मुंबई (अक्षय मांडवकर) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकतेच घोषित झालेल्या 'आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव वनक्षेत्रा'त (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) दुर्मीळ 'लाजवंती' म्हणजेच 'स्लेंडर लोरीस' (Slender lorises) प्राण्याचे दर्शन घडले आहे. शनिवारी रात्री स्थानिक निसर्गप्रेमींना हा प्राणी आढळून आला. मात्र, या दुर्मीळ प्राण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'मधील त्याचे नेमके स्थान गुप्त ठेवण्यात आले आहे. 
 
 
 
 
'लाजवंती' हा माकड कुळातील एक दुर्मीळ प्राणी आहे. केवळ भारत आणि श्रीलंकेतील घनदाट जंगलांमध्ये हा प्राणी आढळतो. पश्चिम घाटाच्या जंगलामध्ये 'लाजवंती'चे वास्तव्य असून घाटाच्या उत्तरेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत या प्राण्याचे अधिवास क्षेत्र मर्यादित आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही केवळ तिलारी आणि आसपासच्या परिसरात हा प्राणी आढळून येतो. गेल्या महिन्यात राज्य सरकारने ५ हजार ६९२ हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या 'आंबोली-दोडामार्ग काॅन्झर्वेशन रिझर्व्ह'ची घोषणा केली. या वनक्षेत्रामध्ये या दुर्मीळ प्राण्याचे दर्शन घडले आहे. स्थानिक निसर्गप्रेमी संजय सावंत, तुषार देसाई, अमित सुतार आणि संजय नाटेकर यांना हा प्राणी दिसून आला. शनिवारी रात्री निसर्गभ्रमंतीदरम्यान 'लाजवंती' हा प्राणी आम्हाला आढळून आल्याची माहिती संजय सावंत यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. या प्राण्याचे छायाचित्र टिपण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
 

slender loris _1 &nb 
'लाजवंती'चा अधिवास आंबोली ते तिलारी दरम्यानच्या परिसरातील जंगलाचे जैविकदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत असल्याचे अमित सुतार यांनी सांगितले. या दुर्मीळ प्राण्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही तो सापडलेल्या ठिकाणाचे नेमके स्थान गुप्त ठेवत असल्याचे त्यांनी नमूद केले. 'लाजवंती' निशाचर असून तो अत्यंत हळू हालचाल करतो. हुबेहूब एखाद्या लहान मुलासारखा दिसत असल्यामुळे त्याला 'वनमानव' देखील म्हटले जाते. 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत या प्राण्याला प्रथम श्रेणीचे म्हणजेच वाघाच्या दर्जाचे संरक्षण मिळाले आहे. लाजवंतीचा आकार ४० सेंटीमीटर असून त्याचे वजन १८० ग्रॅम असते. 
 
तस्करीचा धोका 
अत्यंत दुर्मीळ असणाऱ्या 'लाजवंती' प्राण्याचा प्रत्येक अवयव हा अत्यंत औषधी असल्याचा प्राणी तस्करांचा समज आहे. त्यामुळे या प्राण्याला वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तसेच जादूटोणा, करणी यासाठी तांत्रिक मांत्रिकांकडून या प्राण्याला मोठी मागणी असल्याची चर्चा आहे. तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारे या प्राण्याची तस्करी आणि शिकार झाल्यामुळे झपाट्याने त्यांची संख्या कमी झाली आहे. 
Powered By Sangraha 9.0