तरुणांना राष्ट्रवादाने प्रेरित करणे आवश्यक : सुनील देवधर

21 Dec 2020 22:19:56

Sunil Deodhar_1 &nbs
 
 
 
मुंबई : “आपल्या देशात राष्ट्रविरोधी विविध शक्ती कार्यरत आहेत. या शक्तींना सामोरे जाण्यासाठी आजच्या तरुणांना राष्ट्रवादाने प्रेरित करावे लागेल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी केले. सा. 'विवेक' व 'हिंदी विवेक'च्यावतीने 'राम मंदिर ते राष्ट्र मंदिर' ग्रंथानिमित्ताने आयोजित ऑनलाईन हिंदी राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे समारोपाचे पुष्प त्यांनी सोमवार सायंकाळी ०७ वाजता 'उदयमान भारत और युवा शक्ती' या विषयावरील त्यांच्या व्याख्यानाद्वारे गुंफले. त्यावेळी ते बोलत होते. देवधर यांनी आपल्या भाषणात देशातील फुटीरतावाद, युवकांसमोरची आव्हाने याबाबत विस्तृत भाष्य केले आणि प्रभू रामचंद्रांच्या विचारांचे पैलूंचे दर्शन घडविले.
 
 
देवधर म्हणाले, “देशातील अनेक विद्यापीठांमध्ये फुटीरतावादी लोक युवकांना संभ्रमित करून देशाविरुद्ध बोलण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. अशा गोष्टींपासून युवकांनी वेळीच सावध राहिले पाहिजे. आजचा युवक विविध प्रकारच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. एक सशक्त व निरोगी जीवन जगण्यासाठी युवकांनी व्यसनमुक्त जीवन जगावे,” असेही देवधर यांनी सांगितले. भारताला परमवैभवशाली राष्ट्र बनविण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याविषयी विचार मांडताना देवधर म्हणाले, “देशाला महाशक्तिराष्ट्र म्हणून पुढे आणायचे असेल तर हिंदुत्वाचा, भारतीयत्वाचा मार्ग पत्करावा लागेल. महापुरुषांनी दिलेल्या विचारवाटेवर चालावे लागेल. देश महाशक्ती होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आत्मनिर्भर भारत' संकल्पनेचा नारा दिला आहे. या योजनेमुळे एक सशक्त राष्ट्र म्हणून भारताचा निश्चितच उदय होईल.”
 
 
“आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात पाश्चात्त्य देशांचे अंधानुकरण होत आहे. या समस्येवर उपाय म्हणजे भारतीय संस्कृती व परंपरेचे पालन करणे होय. प्रभू रामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी वाटचाल करावी,” असेही देवधर यांनी शेवटी सांगितले. सा. 'विवेक'च्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी प्रास्ताविक केले, तर मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
सा. 'विवेक'च्या https://www.facebook.com/VivekSaptahik व 'हिंदी विवेक'च्या http://www.facebook.com/hindivivekmagazine या फेसबुक पेजवरून व यूट्युब चॅनेलवरून ही व्याख्यानमाला प्रसारित करण्यात आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0