डाव्यांच्या राज्यात भाजपची चढती कमान!

21 Dec 2020 20:02:00

BJP Kerala_1  H
 
 
 
साम्यवादी पक्षांना, आपल्या बालेकिल्ल्यास कोणी धक्का लावू शकणार नाही, असे एकेकाळी वाटत होते. पण, आता त्यांचा पुरता भ्रमनिरास झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले असेल. एक प्रभावी राजकीय शक्ती म्हणून केरळची जनता भाजपच्या मागे उभी राहत असल्याचे अलीकडील निवडणूक निकालांवरून दिसून येते.
 
 
 
केरळमध्ये राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ म्हणजे ‘पीएफआय’सारख्या संघटना आणि त्या राज्यात असलेले डाव्या आघाडीचे सरकार फुटीर शक्तींना खतपाणी घालत असतानाच, त्या राज्यामध्ये राष्ट्रवादी विचारांच्या शक्तींचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. डाव्या शक्ती आणि जहाल मुस्लीम संघटना यांनी अनेक प्रकारे राष्ट्रीय विचारांच्या संघटनेस रोखण्याचा प्रयत्न केला, तरी त्यामध्ये त्यांना मुळीच यश आलेले नाही. उलटपक्षी त्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे, भारतीय जनता पक्षाचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढतच चालले आहे. राष्ट्रीय विचारांचा प्रभाव त्या राज्यात वाढत चालला असल्याचे प्रत्यंतर या आधी विविध घटनांवरून आले असले, तरी नुकत्याच त्या राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगले यश मिळविल्याचे दिसून येत आहे. साम्यवादी पक्षांना, आपल्या बालेकिल्ल्यास कोणी धक्का लावू शकणार नाही, असे एकेकाळी वाटत होते. पण, आता त्यांचा पुरता भ्रमनिरास झाल्याचे त्यांच्या ध्यानात आले असेल. एक प्रभावी राजकीय शक्ती म्हणून केरळची जनता भाजपच्या मागे उभी राहत असल्याचे अलीकडील निवडणूक निकालांवरून दिसून येते.
 
 
भारतीय जनता पक्षाने पंडलम नगरपालिकेमध्ये एकूण ३३ जागांपैकी आपल्या पक्षाचे १७ उमेदवार निवडून आणले. या नगरपालिकेचे नाव केरळबाहेरील जनतेला फारसे माहीत नसले तरी अलीकडेच, विशिष्ट वयोगटातील महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश देऊ नये, यासाठी हिंदू समाजाने जे उग्र आंदोलन केले, त्या आंदोलनाची युद्धभूमी या नगरपालिकेच्या क्षेत्रातच होती. हिंदू समाजाच्या परंपरा मोडून नवीन पायंडे पाडले जाऊ नयेत, यासाठी केरळमधील हिंदू समाजाने एकवटून सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे केरळमधील डाव्या सरकारलाही नमते घ्यावे लागले. तर ज्या पंडलम नगरपालिका परिसरात अय्यप्पाभक्तांनी तीव्र आंदोलन केले, त्या अय्यपाभक्तांनी मतदानाद्वारे डाव्या शक्तींना चांगलाच धडा शिकविला. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही हिंदू समाजाच्या असंतोषाचा फटका डाव्या आघाडीस बसला होता.
 
 
केरळमध्ये डाव्या पक्षांच्या खालोखाल काँग्रेस पक्षाचे काम असल्याचे मानण्यात येते. पण, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष डाव्या शक्तींना पर्याय म्हणून उभा राहू शकला नाही. एवढेच नव्हे, तर अनेक ठिकाणी प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनही काँग्रेस पक्ष जागा मिळवू शकला नाही. त्याउलट भारतीय जनता पक्ष विविध पंचायत समित्या आणि नगरपालिका यांच्यामध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला आहे. एवढेच नव्हे, तर मल्लपुरम या मुस्लीमबहुल जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्ये भाजपने आपले खाते उघडले आहे. भाजपने २०१५ साली पल्लकड नगरपालिकेवर विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीतही ही नगरपालिका भाजपने आपल्याकडे कायम ठेवली आहे. केरळच्या उत्तर भागाप्रमाणे दक्षिण भागातही भाजपने आपला प्रभाव वाढविला आहे. राजधानीचे शहर असलेल्या तिरुवनंतपुरम महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डावी आघाडी, काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. त्या निवडणुकीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. काँग्रेसला फक्त दहा जागांवर समाधान मानावे लागले, तर भाजपला ३५ जागा मिळाल्या. डाव्या आघाडीस या राजधानीच्या शहरातील महापालिकेमध्ये केवळ साधे बहुमत मिळाले. केरळमध्ये सर्वत्र भाजपचा प्रभाव वाढत असल्याचेच हे द्योतक मानायला हवे! केरळमध्ये भाजपचा वाढत चाललेला प्रभाव, काँग्रेसची होत चाललेली घसरण आणि विविध आरोपांमुळे डाव्या आघाडीची होत चाललेली नाचक्की लक्षात घेता, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये केरळ राज्यात भारतीय जनता पक्ष आपले प्रभावी अस्तित्व दाखविल्यावाचून राहणार नाही.
 
 
‘पीएफआय’चा अध्यक्ष निलंबित
 
 
राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या देशभरातील विविध ठिकाणच्या कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकल्याची, तसेच या ‘पीएफआय’च्या काळ्या कारनाम्यांची माहिती मागील आठवड्यातील लेखामध्ये दिली होती. अंमलबजावणी संचालनालयाने ‘पीएफआय’चा अध्यक्ष असलेल्या अब्दुल सलाम ओवुन्गल (ओमा सलाम) याच्या निवासस्थानावरही छापा टाकला होता. शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी हे छापे टाकण्यात आल्याचा आरोप या ओमा सलाम याने केला होता. पण, आता ‘पीएफआय’चा अध्यक्ष असलेल्या ओमा सलाम यास केरळ राज्य विद्युत मंडळाने नोकरीत नियमबाह्य वर्तन केल्यावरून निलंबित केले आहे. कार्यालयाची परवानगी न घेता, विदेश दौरे केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. विद्युत मंडळाच्या सेवेत असलेल्या ओमा सलाम याच्या राष्ट्रविरोधी कारवाया सुरूच होत्या. पण, आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नव्हती. पण, नुकतीच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जहाल संघटनेचा अध्यक्ष असलेला ओमा सलाम सरकारी नोकरीत इतकी वर्षे कसा काय राहिला, तसेच त्याने इतके विदेश दौरे कसे काय केले? कोणाच्या आशीर्वादाने या ओमा सलाम याचे हे उद्योग सुरू होते? ज्या जहाल संघटनेचा दिल्लीमधील दंगलीमध्ये हात असल्याचा संशय आहे, तसेच उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणामध्ये समाजासमाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न ज्या संघटनेने केला, त्या संघटनेचा अध्यक्ष सरकारी नोकरीत कसा काय राहू शकतो? केरळ सरकारने आता त्याचे निलंबन केले आहे. पण, एका राष्ट्रविरोधी संघटनेच्या अध्यक्षास केरळ सरकारने नोकरीवर ठेवलेच कसे? केरळ सरकारकडे आहे का या प्रश्नाचे उत्तर?
 
धर्मांतरास नकार दिल्याबद्दल हिंदू तरुणावर हल्ला
 
 
 
सध्या सर्वत्र ‘लव्ह जिहाद’ची चर्चा सुरू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या संघटना मोठ्या प्रमाणात आवाज उठवीत असल्या तरी देशातील अनेक राजकीय पक्ष त्याच्याशी सहमत नाहीत. उत्तर प्रदेशसारख्या राज्याने ‘लव्ह जिहाद’ला प्रतिबंध करणारा कायदा आणला असला तरी असंख्य भाजप विरोधकांना मात्र ते मान्य असल्याचे दिसत नाही. हिंदू मुलींना प्रलोभन दाखवून त्यांच्याशी विवाह लावायचा, त्यांचे धर्मांतर करायचे हे प्रकार रोखण्यासाठी ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदे आणून हे प्रकार रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच दुसरीकडे, केरळ राज्यामध्ये एका हिंदू तरुणाने मुस्लीम तरुणीशी विवाह केल्याबद्दल त्याच्यावर धर्मांतर करण्याची सक्ती करण्यात आल्याचे उदाहरण घडले आहे. धर्मांतर करण्यास त्या हिंदू युवकाने नकार दिल्याबद्दल त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याची घटना त्या राज्यात घडली आहे. अभिनंत नावाच्या हिंदू तरुणाने तीन वर्षांपूर्वी एका मुस्लीम तरुणीशी विवाह केला होता. अभिनंत याने धर्मांतर करावे किंवा पत्नीस घटस्फोट द्यावा, असा आग्रह धरणाऱ्या काही मुस्लिमांनी अलीकडेच त्याच्यावर आणि त्याच्या आईवर जीवघेणा हल्ला केला. या मायलेकास अलुवा येथील एका इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. ११ जणांच्या टोळक्याने या दोघांवर हल्ला केल्याचे सांगण्यात येते. एखाद्या मुस्लीम तरुणाने हिंदू मुलीशी विवाह केला, तर त्याची बाजू घेऊन गळे काढण्यास अनेक मानवी हक्क संघटना पुढे येतात. पण, एखाद्या हिंदू युवकाच्या बाबतीत असे घडल्यास ही मंडळी मूग गिळून गप्प असतात! अभिनंत आणि त्याच्या आईवर झालेल्या हल्ल्यानंतरही असेच दिसून आले! अशा मानवी हक्क संघटनांना काय म्हणायचे!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0