लायश्राम मेमांचे कार्य ’वन इंडिया’शी सुसंगत

    दिनांक  20-Dec-2020 22:07:44
|

vinay sahastrbudhe 1_1&nb
 
 
 

‘माय होम इंडिया’च्या पुरस्कार सोहळ्यात विनय सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन


मुंबई (स्वप्निल करळे) : “लायश्राम मेमा या शास्त्रीय संगीताच्या विद्यार्थिनी असल्या तरीही त्यांचा संगीताच्या विविध भाषा, प्रकारात सर्वव्यापी संचार ही त्यांची विशेष ओळख आहे. मणिपुरी भाषेबरोबरच त्यांनी विविध भाषांमध्ये, प्रकारांमध्ये गायलेल्या गीतांमुळे त्यांचे कार्य हे आज त्यांना मिळणार्‍या पुरस्काराशी म्हणजे ’वन इंडिया’या नावाशी सुसंगत आहे,” असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी रविवार, दि. २० डिसेंबर रोजी केले.
 
 
 
 
दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या ‘माय होम इंडिया’च्या दहाव्या ‘वन इंडिया अ‍ॅवॉर्ड’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, ‘माय होम इंडिया’चे अध्यक्ष डॉ.हरीश शेट्टी, सारस्वत बँकेचे गौतम ठाकूर, श्रवण झा आदी मान्यवर उपस्थित होते. दहावा ‘वन इंडिया पुरस्कार’ ‘मणिपुरी संगीताच्या गानकोकिळा’ अशी ओळख असणार्‍या लायश्राम मेमा यांना त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या सांगीतिक, सामाजिक कार्यासाठी देण्यात आला.
 
 
 
 
यावेळी डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले की, “पूर्वांचलच्या प्रश्नांवर गेली १५ वर्षे ‘माय होम इंडिया’ करीत असलेले काम कौतुकास्पद असून, त्यांनी ‘वन इंडिया’चे लावलेले बीज आज मोठ्या वृक्षात रूपांतरित झालेले आहे. भारतात कायम दुर्लक्षित राहिलेल्या पूर्वांचल या भागाची सर्वांनी माहिती घेणे गरजेचे असून त्यांची संस्कृती, भूगोल, इतिहास जाणून घेणे आणि त्या भागाला भेट देणे महत्त्वाचे आहे. शालेय पाठ्यपुस्तकात पूर्वांचलबाबत विशेष धडे असावेत, यासाठी प्रयत्न करणार आहे. कोणतीही गोष्ट जाणून घेतल्याशिवाय त्याबद्दल आत्मीयता वाढणार नाही. या देशाचा कोणताही भाग वेगळा नसून भारतमाता हीच या देशाची ‘मेन लॅण्ड’ आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
 
पुरस्कार स्वीकारताना लायश्राम मेमा म्हणाल्या, “भारताला एकसंध ठेवण्यासाठी ‘माय होम इंडिया’ करीत असलेले काम प्रशंसनीय आहे. मणिपुरी संगीताचा केलेला सन्मान हा माझ्यासाठी बहुमोल असून, पूर्वांचलकडील संगीत, संस्कृती याबद्दल ‘माय होम इंडिया’चे काम आम्हास प्रेरणा देणारे आहे. मी सदैव ‘माय होम इंडिया’च्या महान कार्यासाठी सोबत असेन,” अशीही ग्वाही यावेळी देत, ’बाई माझी करंगळी मोडली’ या मराठी प्रसिद्ध लावणीच्या काही ओळी त्यांनी यावेळी गुणगुणत उपस्थितांची मने जिंकली.या कार्यक्रमात, मुरजीभाई पटेल, डॉ. चित्रलेखा म्हात्रे, अभिजित छाजेड, निशांत गायकवाड, हर्षद मोरदे यांचे प्रातिनिधिक सत्कार करण्यात आले.
 
‘मेमा यांनी त्यांचा आवाज राष्ट्राला समर्पित केला'

‘मणिपुरी गीतांपासून लायश्राम मेमा अनेक भाषेत गाणी गायली. लायश्राम मेमा यांनी आपला आवाज राष्ट्राला समर्पित केला असून यासाठी आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. राष्ट्राला जोडण्याचे काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार देताना आम्हाला आनंद वाटत असून, ‘माय होम इंडिया’ हे देशाला जोडण्याचे गेली १५ वर्षे काम करीत आहे,” असे उद्गार सुनील देवधर यांनी काढले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
Custom-Image-1-v1
Img-Related-News-1-v1
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2
Special-Embed-Code-2