राहुलचे पणजोबा सांगून गेले

20 Dec 2020 21:19:15

Rahul Gandhi_1  
 
 
 
 
संरक्षणविषयक स्थायी समितीच्या बैठकीतून ‘माझं लेकरू’ बाहेर पडलं. विचारले त्याने दोन-चार प्रश्न, तर द्यावी ना त्या सैन्याधिकार्‍यांनी उत्तरं. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर सरळ नकार दिला. काय बाई मिजास! तेही माझ्या राजकुमाराशी. माझ्या बाळानं फक्त सैन्यक्षमता, व्यूहरचना, सेनादलाची गरज यावरच प्रश्न विचारले ना? सांगायचे त्याला. असतील गोपनीय प्रश्न. ती उत्तरं ऐकून देशाच्या सुरक्षितेला असेल धोका. म्हणून काय झाले? माझ्या बाळराजाचा हट्ट होता ना. का बरं पूर्ण केला नाही? म्हणून तो रागाने तेथून उठून आला. त्याने त्यामुळे त्या समितीचे अध्यक्ष ज्युएल ओराम यांच्याविरोधात लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्रदेखील लिहिले. पण काय बाई भाजपचे लोक नतद्रष्ट. माझ्याच रावल्याची चुकी काढतात. राहुल काय समितीपेक्षा मोठा आहे का? असे विचारतात. काढला असेल त्याने अजेंड्याबाहेरचा विषय. पण मग काय झालं. तो राहुल सर्वशक्तिमान, सर्वज्ञानी आहे. त्याने काहीही असंबंध प्रश्न विचारले तर समोरच्याने उत्तर द्यायलाच हवे. या लोकांना कधी कळणार? त्याचे आडनाव ‘गांधी’ हे विसरले वाटतं हे लोक. एवढ्या मोठ्या पंतप्रधानांचा आमच्या ‘मौनमोहन’ ओह सॉरी... सॉरी मनमोहनजींचा आदेश असा टराटरा फाडला त्याने. मग पंतप्रधानांना तेव्हा विरोध केलेला तर हे समिती-बिमिती काय आहे? आता तर आम्ही परत पक्षाध्यक्ष निवडणार आहोत. निवडणार म्हणजे ‘आधीच आमचं ठरलंय.’ कधी मी कधी तो असं. त्यामुळे माझ्या बाळाचा नंबर यावेळी आहे, हे नक्की. आता काही लोक उगीचच माझ्या बाळाबद्दल काहीबाही बोलतात. मी विदेशी म्हणून मला विरोध करून परत मलाच पाठिंबा देणारे शरद पवार. त्यांनीही माझ्या राहुलबाबत काहीबाही बोलावे? आम्ही एक चकार शब्द तरी त्यांच्याबद्दल बोलतो का? त्यांचा अजित कायम धुसफूस करतो. पण आम्ही नाही ते काही बोलत. जाऊ दे. तर विषय होता राहुलचा. त्याने संरक्षण समितीला महत्त्वाच्या गोपनीय आणि देशाच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांची उत्तरे उघड करायला सांगितली. त्याचाही केवढा गवगवा झाला. काही लोक म्हणतात, आमची चीनशी जवळीक आहे. त्यामुळे तर राहुल असे विचारत नाही ना? पण म्हणून काय झालं? ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे राहुलचे पणजोबाच सांगून गेले.
 

यांच्यामुळेच लोकशाही

 
आपण लोकशाही ब्रिटनकडून घेतली, मोदींनी पुतिनप्रमाणे वागण्याची गरज नाही. चर्चिल किंवा जॉन्सनचा आदर्श बाळगावा, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. आता गोपीचंद पडळकर यांनी त्यांना शरदकाकांचा पंटर, खबर्‍या, चमचा वगैरे म्हटले आहे. पण ते त्यांचे वैयक्तिक किंवा एका सामूहिक गटाचे म्हणणे आहे. पण मला तर वाटते की, ते तर मोदींचे सल्लागार आहेत. तेही बिनपगारी. आता काही लोकांचे म्हणणे असते की, बिनपगारी आणि लोचट कारभारी अशी काहीशी म्हण आहे. पण छे... छे... तसेही आपण का म्हणावे? लोकांना काय आहे? ते काहीही म्हणतात. लोक म्हणतात म्हणून आपण का म्हणावे? तर मुद्दा असा की, महाविकास आघाडीचे स्वयंभू रचनाकार संजय राऊत यांनी मोदींना सल्ला दिला आहे की, पुतिन बनू नका चर्चिल आणि जॉन्सन बना. वर ते म्हणतात की, आपली लोकशाही ब्रिटनकडून घेतलेली आहे. तसे पाहिले तर मोदींनी त्यांचे आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि घटनाकार राष्ट्रपुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे कित्येकवेळा सांगितले आहे. त्यामुळे मोदींचे आदर्श या देशाच्या मातीतले आणि संस्कृतीतलेच महापुरूष राहतील, हे उघड आहे. संजय राऊत यांच्या मुक्ताफळांमुळे कळले की आपण लोकशाही ब्रिटनकडून घेतली आहे, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास आहे ते कधीही म्हणणार नाहीत की, आमची लोकशाही ब्रिटनच्या लोकशाहीची ‘कॉपी’ आहे. कारण, बाबासाहेबांचे पहिले गुरू होते, तथागत गौतम बुद्ध. दुसरे गुरू होते, संत कबीर आणि तिसरे गुरू होते महात्मा फुले. तथागतांच्या काळात काय हुकूमशाही होती? तेव्हाही लोकशाही होतीच. रामायण-महाभारताच्या काळात प्रजेला अधिकार नव्हते का? होतेच. तेव्हाही लोकानुयायी शासन होते. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही लोकाधिकार होता. असे असताना संजय म्हणतात की, आम्ही लोकशाही ब्रिटनकडून घेतली. असे म्हणणे म्हणजे भारतीय लोकशाही परंपरेचा अपमान आहे. आम्ही तर आता असे ऐकायची तयारी ठेवली आहे की, सोनिया गांधी आणि शरद पवार आणि महामहिम मुख्यमंत्री होते म्हणूनच भारत स्वतंत्र झाला आणि भारतात लोकशाही निर्माण झाली.


Powered By Sangraha 9.0