दहीहंडी प्रशिक्षक संदीप ढवळेला तडीपारीची नोटीस

02 Dec 2020 16:04:45

Sandip Dhavale_1 &nb
 


राजकीय सूडापोटी कारवाई केल्याचा आरोप

 
 
मुंबई : दहीहंडीचा उत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाणाऱ्या गोविंदा पथक प्रशिक्षक संदीप ढवळे याला तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय कटकारस्थानाचा बळी म्हणून आपल्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप ढवळे याने केला आहे. या संपूर्ण कारवाईत सूड आणि दबाव, असल्याचेही त्याने म्हटले आहे. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करत होते. त्याचा बचाव करण्यासाठी पुढे आलो होतो.
 
 
 
त्यावेळी दुसऱ्या गटातून झालेल्या झटापटीत प्रतिकार करताना काहीजण जखमी झाले होते. पोलीसांत हे प्रकरण गेल्यानंतर ढवळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर काही काळासाठी त्याला तुरुंगातही रहावे लागले होते. जामीन मिळाल्यावर त्याला हजेरीसाठी उपस्थित रहावे लागत होते. मात्र, पोलीसांनी त्यांना अचानक तडीपारीची नोटीस बजावली आहे. ही कारवाई राजकीय दबावापोटी केल्याचा आरोप ढवळे यांनी केला. ढवळे याची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
 
 
 
ढवळेवर काय आरोप लावण्यात आले ?
 
 
तो समाजात दहशत निर्माण करत असून, दुकानदारांकडे खंडणी मागत आहे, असा आरोप ढवळेवर लावण्यात आला आहे. त्या सर्व आरोपांचे त्याने खंडन केले आहे. तडीपारीच्या कारवाईमुळे माझे कुटूंब दबावाखाली आले आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीही माझ्यावरच आहे. काहीही चूक नसताना, अशा प्रकारची कारवाई अयोग्य आहे, असे ढवळेने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. मराठी तरूण असेच तडीपार होवोत आणि देशोधडीला लागोत, अशी व्यथा त्याने अखेर मांडली आहे.
 
 
एक उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक
 
 
संदीप ढवळे मुंबईतल्या जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहे. २६ जुलैचा मुंबईतील महापूर असो, सातारा-सांगलीतील महापूर, कोकणातील चक्रीवादळ आणि कोरोना संकट या सगळ्या ठीकाणी पोहोचून संकटग्रस्तांना मदत करण्याचे काम तो कायम करत राहीला आहे. या प्रकरणात त्याला गोवण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. तसेच सराईत गुंडासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्याने केला आहे. यापूर्वी मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावरही अशीच तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.


का झाली कारवाई ? 

लॉकडाऊन काळात गर्दी जमा करणे तसेच मारहाणी संदर्भात अन्य गुन्हे दाखल असल्याने ही कारवाई झाली असल्याची माहिती संबंधित पोलीस सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी सहानुभूती मिळावी म्हणून संदीप अशाप्रकारे विधान करत आहे, असेही सांगण्यात आले आहे.  




Powered By Sangraha 9.0