वाचा! कशी आहे 'जलीकट्टू'ची ऑस्करकडे घोडदौड

    दिनांक  02-Dec-2020 17:23:00
|

Jalikattu_1  H
 
 
जलीकट्टू हा तामिळनाडूत खेळला जाणारा एक पारंपरिक खेळ. आपल्याकडे पूर्वी बैलगाड्यांच्या शर्यती होत तसाच हा खेळ. पोंगल सणाच्यानिमित्ताने पुष्ट बैलाला लोकांच्या गर्दीत सोडून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न शेकडो तरुण करतात. जो तरुण बैलावर नियंत्रण मिळवेल तो या खेळात विजयी होतो. या खेळात बैल आणि माणसे जखमी होण्याच्या, प्रसंगी मृत्यमुखी पडण्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे प्राणीमित्र संघटनांनी या खेळावर बंदी आणावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टानेही या खेळावर बंदी आणली होती त्यामुळे तमिळनाडूत मोठे आंदोलन पेटले. हे आंदोलन शांत करण्यासाठी अखेर केंद्र सरकारने अध्यादेश आणून या खेळावरील बंदी उठवली होती.
 
 
 
ही पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे याच खेळावर आधारित असलेला 'जलीकट्टू' हा मल्याळम भाषेतील चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आले आहे. 'फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'ने इतर २७ भारतीय चित्रपटातून या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड केली. ऑस्करसाठी पाठवण्यात आलेला हा तिसराच मल्याळम चित्रपट आहे.
 
 
मल्याळी दिग्दर्शक लिझो जॉस पेल्लीसरी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रत्यक्ष जलीकट्टू हा खेळ दाखवण्यात आला नसून खाटीक खान्यातून सुटलेला एक रेडा कसा धुमाकूळ घालतो व त्यातून कशा प्रकारचा संघर्ष उभा राहतो याचे चित्रण आहे. या चित्रपटाची कथा अत्यंत नाट्यपूर्ण व उत्सुकता वाढवणारी आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद आणि नाट्यीकरण इतके विलक्षण आहे की ज्यूरींनी हा चित्रपट पाहताक्षणीच या चित्रपटाला ऑस्करला पाठवण्याचे निश्चित केले. इतकेच नाही तर बहुसंख्य ज्यूरींनी हा चित्रपट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारेल असा विश्वास व्यक्त केला.
 
 
जलीकट्टूसाठी दिग्दर्शक पेल्लीसरी यांनी २०१९ मध्ये गोव्यात झालेल्या ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट दिग्दर्शकाचे पारितोषिक मिळवले होते. चित्रपटाचा प्रीमियर मात्र टोरोंटो येथे करण्यात आला होता त्यानंतर केरळमध्ये हा चित्रपट अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अँथनी वर्गीस, चेंबन विनोद जॉस, सबुमान अबू समद, साथी बालचंद्र या कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
 
 
सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिका वठवण्यासाठी जीव तोडून अभिनय केला आहे. चित्रपटातील अनेक दृष्ये श्वास रोखून धरायला लावणारी असून प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शनही उत्कृष्ट असेच आहे. ग्रामीण जीवन, संस्कृती, गावातील राजकारण, माणसांचा स्वभाव, द्वेष, दुष्मनी, प्रेम, भूतदया अशा सर्वच गोष्टी एकत्र गुंफण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे व त्यात ते कमालीचे यशस्वीही ठरले आहेत.
 
 
भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळावा ही तमाम भारतीयांची इच्छा आहे. ऑस्कर पुरस्कारासाठी जलीकट्टू हा सर्वार्थाने पात्र असा चित्रपट आहे. हा चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीत छाप सोडेल असे आतापासूनच मानले जात आहे. या चित्रपटाने जर ऑस्कर पुरस्कार मिळवला तर ती देशासाठी मोठी अभिमानाची बाब ठरेल. जलीकट्टूला ऑस्करसाठी खूप खूप शुभेच्छा!
 
 
- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.