शास्त्रीय पुरावे आणि कालानुक्रम : एक सिंहावलोकन

19 Dec 2020 20:39:20

arya _1  H x W:


आतापर्यंत या लेखमालेत आपण ‘आर्यांचे आक्रमण/स्थलांतर’ या भ्रामक कल्पनेच्या स्वरूपाचा तपशीलवार आढावा घेतला. विविध संशोधकांनी आणि अभ्यासकांनी या भ्रमाच्या बाजूने पुरावे आणि तर्क देण्याच्या नावाखाली तितकाच मोठा कल्पनाविलास उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यांमध्ये युरोपीय विद्वान आघाडीवर आहेत. त्यांचीच री ओढणारे शहामृगाच्या कुळातले भारतीय विद्वानही काही कमी संख्येने नाहीत! आतापर्यंत या भ्रमाच्या भोपळ्यावर विविध भौतिक पुरावे, शास्त्रीय कसोट्या आणि सबळ तर्काच्या आधारावर विळा चालवण्याचे काम अनेक भारतीय अभ्यासक आणि संशोधकांनी केलेले आहे. त्याचाही तपशीलवार आढावा आपण क्रमश: घेतलेला आहे. लेखमालेत समारोपाच्या दिशेने जात असताना या सर्व व्यापक, किचकट परंतु तितक्याच रंजक असलेल्या मुद्द्यांची वाचकांना संगती लागावी आणि आपल्या मताची निश्चिती व्हावी म्हणून या लेखाचे आयोजन केले आहे.


पाश्चात्त्य विद्वानांचे मत


सदर लेखमालेत प्रत्येक लेखात आपण आर्यांच्या स्थलांतराच्या सिद्धांताच्या विविध पैलूंचे स्वरूप समजून घेतले. त्या त्या बाबतीत पाश्चात्त्य विद्वानांचे मत नेमके काय आहे, ते पाहिले. त्याच्या सोबतच भारतीय अभ्यासकांनी त्याचे केलेले खंडनही आपण पाहिले. काही ज्ञानशाखांच्या बाबतीतसुद्धा अशाच मांडणीतून आपण त्या त्या विषयात झालेले संशोधनही पाहिले. एकूणच या सर्व मांडणीत पाश्चात्त्यांचा सूर साधारणत: असाच राहिलेला आहे की, आर्य नावाच्या वंशाचे कुणी भटके लोक मध्य आशिया किंवा इराणच्या प्रदेशातून उत्तर भारतात इ. स. पूर्व १८०० ते १५००च्या दरम्यान येऊन स्थायिक झाले. त्याच्या नंतर पुढच्या काळात त्यांनी वैदिक साहित्याची निर्मिती केली. पुढे इ. स. पूर्व ४०० ते इ.स. ६००च्या दरम्यान रामायण, महाभारत, पुराणे इत्यादी ग्रंथ रचले. अशाच कालानुक्रमाने विविध ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिरेखा यांनाही त्यांनी त्यामुळेच इ. स. पूर्व १८०० पासून पुढच्या काळाच्या चौकटीत बंदिस्त केले. त्यांच्या या मतानुसार दिसणारी काळाची रेषा कशी दिसते, ते आपण अगदी सुरुवातीला दुसर्‍या लेखातच पाहिले होते. ती काळाची रेषा काहीशी सोबत दिलेल्या चित्र क्र. १ प्रमाणे दिसते.


 ‘आक्रमण’ मताचे खंडन करणारे प्रमुख मुद्दे


या सगळ्या प्रवादात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘आर्य’ शब्दाचा मूळ अर्थ. हा अर्थ मुळात ‘सज्जन’, ‘थोर मनाचा’, ‘उदार चारित्र्याचा’ अशा प्रकारचा ‘गुणवाचक’ आहे, हे आपण पाहिले. या पाश्चात्त्य विद्वानांनी तो त्यांना हवा तसा वळवून ‘वंशवाचक’ बनविला. ही अर्थाची पळवापळवीसुद्धा आपण तपशीलवार पाहिली. वामन शिवराम आपटे संपादित 'The Practical Sanskrit-English Dictionary' या शब्दकोशाची एक वेब आवृत्ती अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठ यांच्या पुरस्काराने चालवली जाते. तिथे नमूद असलेला ‘आर्य’ शब्दाचा सध्याचा अर्थ आणि मूळ शब्दकोशाच्या पहिल्या छापील आवृत्तीतील आपटेंनी दिलेला अर्थ पडताळून बघताना ही पळवापळवी अगदी रंगेहाथ पकडली जाते. ‘आर्य’ शब्द वंशवाचक नाही, हे पाहताना जीवशास्त्रीयदृष्ट्या एखाद्या वंशाची वैशिष्ट्ये काय असतात, ती सिंधू खोर्‍यातल्या उत्खननांमध्ये मिळालेल्या मानवी सांगाड्यांशी कितपत जुळतात वगैरे तपशील अभ्यासावे लागतात. ते बघता तथाकथित आर्य आक्रमणाच्या आधी त्या परिसरात राहणारे तथाकथित ‘मूलनिवासी’ लोक आणि आज त्या परिसरात राहणारे विद्यमान लोक यांचा जीवशास्त्रीय वंश एकच आहे, हे लक्षात येते. असे असताना आर्यांनी आक्रमण करून नक्की कोणाला तिथून दक्षिणेत पळवून लावले आणि मग तिथले आत्ताचे लोक नक्की कोण आहेत, हे प्रश्न शिल्लक राहतातच. त्यांची उत्तरे देण्याची तसदी या पाश्चात्त्य विद्वानांनी आजतागायत घेतलेली नाही.जर तसल्या आक्रमक आर्यांनी ही आक्रमणे केल्यावर वैदिक साहित्याची निर्मिती केलेली असेल, तर तशा पराक्रमाच्या गाथा वैदिक साहित्यात निदान औषधापुरत्या तरी सापडायला हव्यात. पण, त्या तितपतही न मिळाल्याने या आक्रमणाच्या भ्रामक कल्पनेचा रोगी करुणपणे मरतो.


arya_1  H x W:


आज उपलब्ध असलेल्या अनेक ज्ञानशाखांचा उपयोग करून प्राचीन इतिहासावर प्रकाश टाकता येतो. ‘जनुकशास्त्र’ (Genetics) ही अशीच एक ज्ञानशाखा. त्यानुसार मानवी गुणसूत्रे आणि त्यांच्या उत्परिवर्तनाचे (Mutations) प्रकार यांवरून काही संमिश्र निष्कर्ष निघतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे, तिथे उपलब्ध होणार्‍या नमुन्यांची संख्या. निश्चितपणे काही ठोस निष्कर्ष निघेल, इतपत नमुने उपलब्ध न झाल्यामुळे तो नमुना ज्याचा आहे, ती एक व्यक्ती मूळ भारतातलीच होती, की बाहेरून कुठून आलेली होती, एवढेच फक्त सांगता येते. त्यावरून आर्यांनी इतक्या मोठ्या संख्येने भारतात स्थलांतर केल्याचे मत सिद्ध होत नाही. तसे सिद्ध करायचे असेल, तर तितक्या मोठ्या प्रमाणात नमुने गोळा करून तपासायला हवेत. पद्मश्री डॉ. लालजी सिंग यांनी केलेल्या तशा प्रकारच्या संशोधनातून मात्र ही माहिती निर्णायकपणे समोर येते. त्यानुसार भारतीय लोकांचा जनकुीय वंश गेल्या किमान ६० हजारांहून अधिक वर्षांपासून एकच राहिलेला आहे! इथेही भारताच्या बाहेरून इ.स. पूर्व १८०० मध्येच नव्हे, तर गेल्या ६० हजार वर्षांत अशी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरे झाल्याचे गृहितक पूर्णपणे कोलमडून पडते. याच्या उलट, गेल्या ६० हजार वर्षांत भारतातूनच बाहेर लोकांची स्थलांतरे झाल्याचे यातून लक्षात आलेले आहे. या सिद्धांताला ‘भारतातून बाहेर’ सिद्धांत (Out of India Theory - OIT) असे अलिकडच्या काळात नावच पडले आहे. भारतीय उंदीर, भारतीय बैल आणि भारतीय कोंबडा या परावलंबी प्राण्यांचीही शेतीच्या प्रसारामुळे भारतातून बाहेर जगात झालेली स्थलांतरे मागे काही लेखांमध्ये आपण पाहिली. ही गोष्ट सुद्धा या सिद्धांताचीच पुष्टी करतात. कोनराड एल्स्ट (Koenraad Elst) या युरोपीय अभ्यासकाने भाषाशास्त्राच्या (Linguistics) आधारेसुद्धा या सिद्धांताचीच पाठराखण केलेली आहे.


खगोलशास्त्र (Astronomy), भूजलशास्त्र (Hydrology), भूशास्त्र (Geophysics) इत्यादी ज्ञानशाखांच्या अभ्यासातून लक्षात येते, त्यानुसारसुद्धा वैदिक साहित्यातले आणि रामायण-महाभारतासारख्या इतिहास काव्यातले खगोलीय संदर्भ या साहित्याला इ. स. पूर्व २४ हजार वर्षांपर्यंत मागे नेऊन ठेवतात. या संदर्भात आपण लोकमान्य टिळक, डॉ. प. वि. वर्तक, श्रीकांत तलगेरी, निलेश ओक इत्यादी अभ्यासकांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांच्या आधारे या बाबतीत ठरविलेल्या कालानुक्रमाचा एक धावता आढावा घेतला होता. त्यांचे निष्कर्ष पाहून चटकन ध्यानात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, युरोपीय आणि इतर पाश्चात्त्य विद्वान सांगतात त्या इ.स. पूर्व १८००च्या सुमारास आर्यांचे काल्पनिक आक्रमण होण्याच्या आधीच्या काळातच वैदिक संस्कृती भारतात रुजलेली होती. सरस्वती नदीची वर्णने आणि तिच्या प्राचीन पात्राचा भूस्तरीय अभ्याससुद्धा हेच दाखवतो. सरस्वतीच्या खोर्‍यात मिळालेले काही पुरातत्त्वीय अवशेषसुद्धा ती नागरीकरणे वैदिक संस्कृतीचीच असल्याची साक्ष मूकपणे देतात. या बाबतीत आपण डॉ. श्रीनिवास कल्याणरमण यांचा या बाबतीतला एक शोधनिबंध आणि त्यातले निष्कर्ष उदाहरणार्थ म्हणून पाहिले होते. घोडे आणि रथ यांचे पुरातत्त्वीय अवशेषसुद्धा अगदी निर्णायकपणे वैदिक संस्कृतीलाच दुजोरा देतात. अशी अनेक लहान मोठी संशोधने उपलब्ध आहेत.


arya_1  H x W:
महाभारताच्या काळाच्या पुढचा इतिहाससुद्धा असाच संगतवार काळाच्या रेषेवर मांडून दाखवता येतो. या विषयात वेदवीर आर्य यांचे चार खंडांत मावेल इतके सप्रमाण संशोधन उपलब्ध आहे. असेच अजूनही काही अभ्यासकांचे लहान-मोठे शोधनिबंध उपलब्ध आहेत. पाश्चात्त्य मतानुसार काळाची रेषा या बाबतीत काय सांगते, हे इथे आपण यापूर्वी पाहिलेच आहे. परंतु वर उल्लेख केलेल्या (आणि न केलेल्यासुद्धा) या सर्व अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार हा कालानुक्रम (Chronology) आमूलाग्र बदलावा लागतो. आर्यांचे आक्रमण किंवा स्थलांतर सिद्ध करण्यासाठी पाश्चात्त्य विद्वानांनी काळाच्या रेषेशीसुद्धा बरीच छेडछाड केलेली आहे. त्या सर्व खटपटींच्या नादात त्यांनी अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि घटनासुद्धा काळाच्या रेषेवर निदान १२-१३ शतके तरी पुढे ढकललेल्या आहेत. त्यांना वर वर्णन केलेल्या विविध पुराव्यांच्या आधारे आपल्या योग्य जागेवर आणून बसविले की हीच कालरेषा काहीशी चित्र. क्र. २ मध्ये दिल्याप्रमाणे दिसू लागते.

वर उल्लेख केलेल्या अभ्यासकांच्या शिवायही आजवर अनेक भारतीय अभ्यासकांनी या विषयात आपले योगदान दिलेले आहे, आजही देत आहेत. या सर्वांचे निष्कर्ष एकसमान आहेत, असे नाही. त्यांना एकमेकांचे निष्कर्ष मान्य होतातच, असेही नाही. या अभ्यासकांच्या निष्कर्षात आपापसात फरक पडलेला का बरे दिसतो? यासाठी आधारभूत झालेले असे जे उल्लेख या प्राचीन साहित्यात सापडतात, त्या संस्कृत वाक्यांचा अर्थ लावण्याच्या पद्धतीमुळेच प्रामुख्याने असा फरक या सर्व अभ्यासकांच्या निष्कर्षांमध्ये दिसतो. विज्ञानाच्या ज्या क्षेत्रात असे संशोधन होते, त्या क्षेत्राच्या आजच्या मर्यादाही याला कारणीभूत असतात. या मर्यादा जसजशा बदलत जातील, तसतसे यातले काही निष्कर्ष बदलू सुद्धा शकतील. आणि या सर्व ऊहापोहातून शेवटी उरतात ती हीच तथ्ये : ‘आर्य’ नावाचा कोणताही वंश अस्तित्वात नाही. हा शब्द फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही राहणार्‍या प्रत्येक सज्जनाला उद्देशून आपण वापरू शकतो. या देशातल्या रहिवाशांचे प्राचीन पूर्वज गेल्या निदान ६० हजार वर्षांपासून मूळ इथलेच होते. आर्यांचे भारताच्या बाहेरून भारतात झालेल्या स्थलांतराचा आणि आक्रमणाचा सिद्धांत निखालस खोटा! (क्रमश:)


- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान -
अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’  विषयाचे अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0