बापरे ! डोंबिवलीतील 'ही' कंपनी भीषण आगीत जळून खाक

18 Dec 2020 21:55:18

Dombivali _1  H
 
 

कल्याण : कल्याण खंबाळापाडा रोडवरील डोंबिवली एमआयडीसीत असलेल्या शक्ती प्रोसेस या टेक्सटाईल कंपनीला आज सायंकाळी भीषण आग लागली.या आगीत कंपनीतील कच्चा माल जळून खाक झाला आहे. आग विझविण्याचे अग्नीशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. आग रात्री उशिरार्पयत नियंत्रणात आली नव्हती. शक्ती प्रोसेस ही टेक्साटाईल कंपनी बंद आहे. या कंपनीत देखभाल दुरुस्तीचे काम काही कामगार करीत होते.
 
 
कंपनीत अचानक सायंकाळी साडे पाच वाजता आग लागली. आग लागल्याचे कळताच देखभाल दुरुस्ती करणारे काम जीव मुठीत घेऊन कंपनी बाहेर पळाले. कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झालेली नाही. कंपनीला आग लागल्याचे कळताच अग्नीशमन दलाला कळविले गेले. अग्नीशमन दलाच्या गाडय़ा पाच वाजून ५० मिनिटांनी कंपनीत दाखल झाल्या. कंपनीतील आगीने थोडय़ाच वेळेत भीषण स्वरुप धारण केले. कंपनीत मोठय़ा प्रमाणात कच्चा माल होता. कच्च्या मालाने पेट घेतल्याने आग वाढत गेली. आग विझविताना अग्नीशमन दलाचे जवान सुभाष वारे हा खाली पडून जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
 

Dombivali _2  H 
 
 
 
आग लागल्याचे कळताच मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी आरोप केला आहे की, आज शुक्रवार असताना कंपनीत उत्पादन प्रक्रिया बंद होती. बंद कंपनीत देखभाल दुरुस्ती करताना कंपनी मालकाने परवानगी घेतली होती का. परवानगी नसताना देखभाल दुरुस्ती कशी काय केली जात आहे. शुक्रवारच्या दिवशी कंपनीला आग लागल्याने हा सगळा प्रकार संशयास्पद आहे. डोंबिवली आगीत जळून खाक झाल्यावर औद्योगिक सुरक्षा संचालनालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, पोलिस यांना जाग येणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. मागच्याच आठवडय़ात सोनारपाडा येथील बेकायदा भंगार गोदामाला भीषण आग लागली होती. त्या पाठोपाठ शक्ती कंपनीला भीषण आग लागली आहे. या घटना पाहता यंत्रणा या मानवी जीविताशी खेळत असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
Powered By Sangraha 9.0