वैदिक सणांचे योग रहस्य भाग-८

16 Dec 2020 21:01:52

Govardhan_1  H



गोवर्धनोत्सव
गोवर्धन म्हणजे जड पर्वताची पूजा का करायची? वृंदावनातील सर्व गोप-गोपी भगवंतांचे पूजन करू लागले. इतके की, त्याकाळी या दिवशी जी इंद्रपूजा व्हायची, ती न करता स्वतःची पूजा करण्यास कृष्णाने सांगितले. साहजिकच इंद्राला राग आला. आपली पूजा मोडून स्वतःची पूजा करणारा हा कालचा मुलगा कोण? इंद्र पर्जन्याचा स्वामी! तो पर्जन्याशिवाय कशाची बरसात करणार? इंद्राला राग आला.
 
पण, करणार काय? कृष्णाला विरोध करण्याचे इंद्रात सामर्थ्य नव्हते. त्याने आपल्या शक्तिनुसार पर्जन्याच्या सरीवर सरी कोसळविल्या. सर्वत्र पाणीच पाणी, आता काय करावे? वृंदावन त्या पुरात बुडणार की काय, अशी परिस्थिती उत्पन्न झाली. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या करंगळीवर धरला. भगवंत म्हणाले, “लावा रे आपापल्या काठ्यांचा आधार या गोवर्धनाला.” गोपांनी तसे केले. मध्यंतरी गोपांना दर्प झाला की, आपल्याच काठ्यांवर हा गोवर्धन तोलला गेला आहे. कृष्णाने ते ताडले. करंगळीचा आधार काढण्यास सुरूवात केली.
 
गोवर्धन गडगडायला लागला. ’‘अरे अरे कृष्णा, तू आपली करंगळी काढू नकोस. गोवर्धन खाली पडून आम्ही चिरडले जाऊ. आमच्या काठ्यांच्या बळावर नाही हा गोवर्धन तोलला गेला. नारायणा, तुझाच पराक्रम हा.आता आमचा दर्प पार गेला.” इंद्र पर्जन्य पाडून पाडून थकला. गोवर्धनाखाली सारे गोपूर सुरक्षित होते. इंद्राने पाहिले की कृष्ण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. इंद्र भगवंताला शरण आला. या घटनेचे स्मरण म्हणजे ‘गोवर्धनोत्सव’ होय. व्यासकृत गोवर्धन कथा अशी आहे. यातील भगवान कृष्णाची आम्हाला या अगोदर माहिती झाली आहे.
इंद्र म्हणजे इंद्रियातील स्वामित्वाची भोगशक्ती हेसुद्धा आम्ही पाहिले आहे. इंद्रियसौख्याला सरावलेला इंद्र त्याचे इंद्रिय पूजन न करणार्‍या साधकावर रागावणारच! ‘गौ’ म्हणजे इंद्रिये आणि गोपी म्हणजे त्यांतील सुप्त शक्ती, ज्या साधकाला स्वतःची जाणीव झाली तो आपल्या इंद्रियांचे फाजील लाड पुरविणार नाही. परंतु, इंद्रिये एकदमच स्वाधीन होत नसतात. ते बराच काळ त्यांच्या पूर्व संस्कारांना धरून राहतात आणि श्रेष्ठ अशा साधकालासुद्धा त्रास देतात.
 
‘इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मन:॥ (भगवद्गीता, श्लोक ६०, अध्याय २ गीता) भगवंत सांगतात, इंद्रियांच्या प्राकृतिक संस्कार शक्तीचा वर्षाव टाळण्याकरिता म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलला आणि इंद्रियांच्या संस्कार शक्तीचा वर्षाव वाचविला. ‘गौ’ म्हणजे इंद्रियांतील शक्ती आणि वर्धन म्हणजे त्या शक्तींना वाढवून श्रीकृष्णाने गोवर्धन उभा केला. काट्याने काटा काढला गेला आणि भगवान श्रीकृष्णाला इंद्र शरण आला. अशी ही गोवर्धनपूजा प्रतिपदेला करतात. यावरून व्यासकाळात मनाच्या सूक्ष्म छटा आणि त्यावरील योग्य उपचार यांचे शास्त्र किती उच्च अवस्थेत होते यांची कल्पना या भिन्न नावांवरून आणि कथांवरून होते!
 
भ्रातृद्वितीया (भाऊबीज)आणि कालगणनेचा वैज्ञानिक सिद्धांत
द्वितीयेला भाऊबीज येते. यालाच वैदिक भाषेत ‘यमद्वितीया’ म्हणतात. भाऊबीज म्हटली की सार्‍या आर्य स्त्री जातीला एका अवर्णनीय आनंदाचा प्रत्यय येतो. भावाबहिणीचे इतके निर्व्याज प्रेम जगात कुठेच सापडणार नाही. त्याला ओवाळून आयुष्यमान होण्याची कामना करतात. मंगल भाऊबीज! वैदिक वाङ्मयात भ्रातृद्वितीयेचे वर्णन थोडे निराळेच आहे. यमी आणि यम नावाचे दोघे बहीण भाऊ होते.
त्या काळात दिवस आणि रात्र नसल्यामुळे कालगणना करता येईना. परंतु, कितीही झाले तरी यम-यमी मर्त्यच! यम मरण पावला. काळ नसल्यामुळे किती काळापूर्वी यम वारला हे यमीला सांगताच येईना. कालसातत्यामुळे तिचे दुःख कायमच होते. ब्रह्मा, विष्णू, महेश तिचे सांत्वन करायला आले आणि म्हणाले, “यम केव्हा मेला?” यमी उत्तरली, ’आत्ताच’ आणि जोराने रडायला लागली. आता काय करावे? त्रिमूर्तीत विचारविनिमय झाला. ब्रह्मदेवाला काल निर्माण करण्यास आज्ञा झाली. कालगती वाढू लागली. पृथ्वी स्वतः भोवती फिरायला लागली.
दिवस आणि रात्र उत्पन्न झाले. ’सूर्या चन्द्र मसौ धाना यथा पूर्वमकल्पयत्। दिवं च पृथिविचांतरिक्ष मथो स्वः॥’ रात्र आली. यमी झोपायला लागली. कालांतराने यमी-यमाच्या मृत्यूचे दुःख विसरली. यमीवर तिच्या भावाचा मृत्यू पाहण्याचा जो प्रसंग गुदरला, तो आपल्यावर येऊ नये म्हणून या यमद्वितीयेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला ओवाळून आयुष्यमान होण्याची कामना करते. तो हा मंगल आयुष्यमान बनण्याचा दिवस म्हणजे भाऊबीज वा यमद्वितीया होय.
सध्या आपली पृथ्वी स्वांगपरिभ्रमण करते. त्यामुळे आपल्याला दिवस-रात्र भासतात. परंतु, एकेकाळी पृथ्वी स्वतःभोवती फिरत नसून स्थिर होती, असे आजचे भूवैज्ञानिक मानतात. पृथ्वी ज्यावेळेस स्थिर होती, त्यावेळेस पृथ्वीवर दिवस आणि रात्र असे पर्याय नव्हते. यम-यमीचा काळ तो आहे. ऋग्वेदातही पृथ्वीचे स्वांगपरिभ्रमण बंद झाल्याबद्दल वर्णन करणारी ऋचा आहे. उषा स्तोत्रात ती आली आहे. ’वयश्चिते पदत्रिणो द्विपच्चतुस्पदर्जुनि । उषः पारऋत रतु दिवो अन्तेम्य स्परि॥’ (ऋ. प्रथम मंडल, वर्ग 6 , अध्याय 4) या ऋचेतील अर्थानुसार एकेकाळी पृथ्वी स्थिर होती असे दिसते. हा काळ किती पूर्वीचा असावा? भूवैज्ञानिक म्हणतात, 350 कोटी वर्षांपूर्वी! अबब! काय ही कालगणना? मग त्यावेळेस यम-यमी पृथ्वीवर राहत होती का ?
याचे उत्तर अद्ययावत विचार करणार्‍या वैज्ञानिकांनी द्यावे किंवा पोथीनिष्ठ आत्मगौरवी पंडितांनी द्यावे. आपल्या कामापुरता आपण निर्देश केला आहे. यम-यमी जरी त्या अतिप्राचीन काळात नसली तरी त्या अतिप्राचीन काळाची माहिती आमच्या ऋषिमुनींना होती, कमीत कमी भगवान वेदव्यासांना तरी होती, हे यावरून स्पष्ट आहे. वैदिक जाणिवेची परंपरा इतकी प्राचीन आहे. मग वेदांचा रचना काळ तुम्ही तीन हजार वर्षांपूर्वीचा माना की पाच हजार वर्षांपूर्वीचा, वेदांना मनुष्यकृत काव्ये माना की अपौरुषेय माना. वैदिक कालगणनेला पृथ्वीची ही स्थिर गती निश्चितपणे माहीत होती एवढे खरे. त्या प्राचीन कालस्मरणाचे स्मरण म्हणजे ही यमद्वितीया किंवा भ्रातृद्वितीया होय! वैदिक परंपरा किती प्राचीन आहे याची या कथेवरून कल्पना येऊ शकते.
(क्रमशः)
- योगिराज हरकरे
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9594737357/9702937357
Powered By Sangraha 9.0