नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल

16 Dec 2020 17:50:47

ELECTION_1  H x




ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या अधिकार व निधीमुळे निवडणुकीत रंगत

नाशिक: नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कोरोना संकटामुळे सरकारने मार्च ते डिसेंबर काळात मुदत संपलेल्या आणि नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका तसेच स्थगित केलेल्या निवडणुका आता २०२१ मध्ये घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीचा पहिला टप्पा म्हणून राज्य निवडणूक आयोगामार्फत ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


नांदगाव तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजताच राजकीय पक्षांनीही निवडणुकीसाठी चाचपणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार करण्यापासून ते स्थानिक पातळीवरील समविचारी पक्षांशी युती-आघाडी करण्यासाठी प्राथमिक स्वरुपात चर्चा होत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.



तालुक्यातील न्यायडोंगरी, मांडवड, गंगाधरी, बाणगाव, बोलठाण, मोहेगाव, कळमदरी, जातेगाव, वेहेळगाव, साकोरा, तर तालुक्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या पानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक चुरशीची व डावपेचांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात आहे. त्यामुळे गुप्त बैठका आणि मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शासनाने गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात अधिकार दिल्यामुळे व गावपातळीवर विकासकामांसाठी थेट व भरघोस निधी मिळत असल्याने आता ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.



Powered By Sangraha 9.0