नित्य साधनाकर्ता ‘मुकुंद’

15 Dec 2020 21:02:24
mukund_1  H x W
 
 
 
 
ग्रामीण भागातील परिवेश लाभूनही विनापाठबळ संगीतक्षेत्रात आपले अधिष्ठान निर्माण करणारे मुकुंद भालेराव यांच्याविषयी...
 
 
 
व्यक्तीला प्राप्त होणारा परिवेश हा त्याच्या जडणघडणीवर नक्कीच प्रभाव टाकत असतो. तसेच, तो परिवेश हा व्यक्तीने आपल्या कर्माची नित्य साधना केल्यास आणि जाणिवांची खरी अनुभूती अनुभवल्यास व्यक्ती विकासास नक्कीच प्रेरणादायी ठरत असतो. याचीच प्रचिती मुकुंद नामदेव भालेराव यांचा जीवनपट पाहताना येते.
 
 
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले हा मूलतः वनवासीबहुल तालुका. निसर्गाची संपन्नता आणि प्रवरा नदीचा अखंडित प्रवाह यांची गुणदर्शकता भालेराव यांच्या जीवनपटात दिसून येते. ‘फाईन आर्ट्स’मध्ये पदवी प्राप्त केलेले भालेराव हे व्यावसायिक चित्रकार, गीतकार आहेत. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण हे अकोले येथील मॉडर्न हायस्कूल येथे झाले. तर पुढील शिक्षण हे पुणे येथील अभिनव कला महाविद्यालयात झाले. ९०च्या दशकात सुरू असलेला भालेराव यांचा शैक्षणिक प्रवास हा अपुरी साधन व्यवस्था व असहज उपलब्ध असणारे मार्गदर्शन यांच्या चौकटीत सुरू होता.
 
 
२००० साली पुण्यात आल्यानंतर गावाकडील विद्यार्थ्याला शहरात आल्यावर ज्या काही प्रसंगांना सामोरे जावे लागते, ते सर्व प्रसंग भालेराव यांच्या जीवनात आले. मात्र, जीवनसंघर्ष जीवनानुभव देणारा ठरला. त्यामुळे जाणिवा समृद्ध होत गेल्या. खर्चिक शिक्षण असल्याने आवश्यक असणारे रंग घ्यावे की जेवण घ्यावे, असे द्वंद भालेराव यांनी या काळात अनेकदा अनुभवले. घरून प्राप्त होणार्‍या पैशांचे कितीही योग्य नियोजन केले, तरी प्रत्येक महिन्यातील काही दिवस वडापाव हेच भालेराव यांचे भोजन असे. पैसे संपल्यास व ज्या बसचा पास आहे, ती बस चुकल्यास पदभ्रमंती ही ठरलेली.
 
 
अविरत संघर्ष केला की, एक दिवस संघर्षालादेखील थकवा येत असावा, तसेच काहीसे भालेराव यांच्या बाबतीत झाले. हळूहळू पुण्यात जम बसत गेला. आर्थिक हातभार लागावा यासाठी ते चित्रकलेची, ग्राफिक्स डिझायनिंगची कामे घेऊ लागले. ग्रिटिंग्ससाठीचा मजकूर लिहिण्यासही त्यांनी सुरुवात केली. सर्वसामान्य भारतीयांना चित्रपटाबद्दल असणारे आकर्षण हे भालेराव यांनादेखील होतेच. शालेय जीवनात कविता करणे, बासरी वाजविणे आदी छंदही त्यांनी जोपासले.
 
 
शालेय जीवनात मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक विजय सहस्रबुद्धे हे गुरू म्हणून त्यांना लाभले. त्यांनी भालेराव यांना बासरी वादन शिकविले. तेथूनच संगीताचा श्रीगणेशा झाला. यातून संगीताचा प्रवास कसा असतो हे लक्षात आले. त्यामुळे संगीतनिर्मिती प्रक्रियेचा आनंद भालेराव यांना मिळत गेला. शालेय जीवनात लाभलेले शिरीष देशपांडे, मोरेश्वर धर्माधिकारी, सुधीर जोशी आदी शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रम न शिकविता, मुलांमध्ये कला, साहित्यप्रति रसिकता निर्माण करण्याचे कार्य केले. त्यामुळे ग्रामीण भागाचा परिवेश लाभूनही याच शिदोरीवर भालेराव यांचे शहरी भागातील आयुष्य हे समृद्ध होण्यास मदत झाली.
 
 
शिक्षक शिकवीत असलेल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ त्यांनी त्यावेळी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला. त्यामुळे भालेराव यांची कविता लेखनाची ऊर्मी जागृत झाली. शिक्षकांच्या विद्यार्थीकेंद्री शिकविण्याच्या पद्धतीमुळे मुलांमध्ये निर्मिती क्षमता वाढण्यास मदत झाली, असे भालेराव सांगतात. २००९ मध्ये पुण्यात भालेराव हे ‘हृदयगंध’ नावाच्या एका समूहाच्या संपर्कात आले. त्यात ‘कधी वाटतं...’ या उपक्रमाच्या माध्यमातून स्वतःची लिहिलेली व संगीतबद्ध केलेली गाणी सादर केली जात आहेत. या व्यासपीठावरून भालेराव यांनी २५० कार्यक्रमांत सहभाग नोंदविला.
 
 
कविता लिहिणे व त्या स्वरबद्ध करून सादर करणे, बासरी वादन करणे आदीत त्यांचा सहभाग असे. २०१५ मध्ये अपत्यप्राप्तीपश्चात कौटुंबिक जबाबदार्‍यांमध्ये वाढ झाल्याने भालेराव ‘ऑफ स्टेज’ झाले. त्यावेळी विविध दूरचित्रवाहिनी मालिका, चित्रपट, जाहिरात यासाठी गाणी लिहून देण्याचे कार्य भालेराव यांना स्वतःहून येत असे. त्यांनी ‘सोनी टीव्ही’ या वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘मेरे साई’ या मालिकेसाठी शीर्षकगीतासह जवळपास २५ गाणी त्यांनी लिहिली आहेत.
 
 
मराठी वातावरण व माध्यमात वावरणार्‍या भालेराव यांची सुरुवात हिंदी गाणी रचण्याने झाली, हे विशेष. आजवर भालेराव यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, सुरेश वाडकर, साधना सरगम, मयुरेश पै, जावेद अली, महालक्ष्मी अय्यर, जयदीप वैद्य आदी संगीत क्षेत्रातील धुरिणांसाठी आपले संगीतमय योगदान दिले आहे. आजवर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ मालिका, ‘गोंधळ’ मराठी चित्रपट, यासह अनेक जाहिरातींची गाणी भालेराव यांनी लिहिली आहेत. कोरोनाकाळातही मुंबई मेट्रोचे काम हे अविरत सुरू आहे. हे दर्शविणारी ‘जिंगल’ही त्यांनीच शब्दबद्ध केलेली. पुणे येथे पार पडलेल्या ‘रोल बोल वर्ल्डकप’ची ‘अँथम’ भालेराव यांनी लिहिली असून, मागील पाच वर्षांत त्यांनी १००च्यावर गाणी लिहिली आहेत.
 
काही वेळेला रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून कलाकारांच्या वेदनांचे भांडवल होऊन जे काही संगीतक्षेत्रात कार्य होते, ते वेदनादायी असल्याचे ते नमूद करतात. कला नैसर्गिक असून त्याचा आविष्कार हा अभ्यासपूर्ण असावा, असे भालेराव यांचे स्पष्ट मत आहे. ग्रामीण भागात जडणघडण होऊनही ठरविल्यास व्यक्ती कोणतेही पाठबळ नसताना कसा पुढे जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण हे भालेराव आहेत. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!



Powered By Sangraha 9.0