जेएनपीटी बंदर क्षेत्राची भरीव प्रगती

15 Dec 2020 21:18:00

JNPT _1  H x W:



जवाहरलाल नेहरू बंदर न्यास (JNPT) हा प्रकल्प भारतीय बंदरांच्या मालपेट्यांच्या (container cargo) विकासातील एक मोठा टप्पा मानला जातो आहे. हे न्यास नवी मुंबईच्या न्हावा-शेवा क्षेत्रामध्ये ३१ वर्षांपूर्वी स्थापन झाले. येथील विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...
 
 

कंटेनर टर्मिनल्स
 
जेएनपीटी बंदराची देशातील आयात-निर्यात व्यापारवृद्धी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जेएनपीटीमध्ये एकूण पाच कंटेनर टर्मिनल्स आहेत व हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कंटेनर बंदर म्हणून नावारूपाला येत आहे. जागतिक पातळीवर कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटीचा २८ वा क्रमांक आहे.
 
 
 
सध्या जेएनपीटी येथे अनेक प्रकल्प सुरू आहेत. ‘पोर्ट ऑफ सिंगापूर ऑथॉरिटी’तर्फे आठ हजार कोटी रुपयांचे चौथ्या टर्मिनलचे कामही सध्या सुरू आहे व यात १०० टक्के भारतनिर्मित (मेक-इन-इंडिया) परदेशी गुंतवणूक आहे. पहिल्या टप्प्याची क्षमता २.४ दशलक्ष टीईयू (वीस फूट एकक) असून, हे काम फेब्रुवारी २०१८ साली सुरू झाले. दुसर्‍या टप्प्याचे काम झाल्यावर (२०२२ नंतर) ही क्षमता दहा दशलक्ष टीईयू होईल.
 
 
 
कोरोना संकट असतानाही जेएनपीटीच्या कंटेनर उलाढालीमध्ये ऑक्टोबरपर्यंत ११ टक्के वाढ दिसून आली आहे. सर्वाधिक वाढ मुख्य बंदरापेक्षा न्हावा-शेवा बंदराकरिता झाली आहे. उर्वरित बंदरांकरिता स्थिती एवढी चांगली नाही.
जेएनपीटी बंदराच्या जवळील ‘सेझ’ व्यतिरिक्त महाराष्ट्रातील जालना, वर्धा, नाशिक व सांगली येथे ड्राय पोर्ट्सचा विकास केला जात आहे. जेएनपीटीतर्फे होणार्‍या एकूण कार्गो वाहतुकीपैकी ४० टक्के वाहतूक ही महाराष्ट्रातील कंटेनरची असते. लवकरच महाराष्ट्राचा आंतरिक भाग जेएनपीटी बंदराला जोडला जाणार आहे.
 
 
 
बहुउद्देशीय आर्थिक क्षेत्र (सेझ)
 
 
जेएनपीटी कंटेनर पोर्टच्या शेजारी २७७ हेक्टर्समध्ये बहुउद्देशीय उत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) स्थापन केले जात आहे. या पहिल्या बहुउद्देशीय ‘सेझ’चे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये उद्घाटन केले. हे ‘सेझ’ मालाची मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय आयात-निर्यात करण्यासाठी स्थापले गेले आहे.
 
 
 
ही ‘सेझ’ची जागा कच्चा माल मिळण्यासाठी, पक्का माल बनविण्यासाठी आणि जागतिक व्यापारवृद्धीकरिता अनेक ठिकाणांना रेल्वेने व रस्त्याने जोडली जाणार आहे. यात मुंबई, नवी मुंबई, पुणे, नवी मुंबई विमानतळ (प्रस्तावित), मुंबई विमानतळ, माल पोहोचण्याकरिताच स्थापलेला टर्मिनल मार्ग (DFC) इत्यादी स्थाने उपयोगात आणून जोडली जाणार आहेत. बंदर आधारित ‘सेझ’चा विकास साधणारे जेएनपीटी हे देशातील पहिले बंदर ठरणार आहे.
 
 
 
जेएनपीटीच्या ‘सेझ’मध्ये बांधकाम करण्यासाठी पाच कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे. या ‘सेझ’मध्ये (विशेष आर्थिक क्षेत्र) पायाभूत सुविधांची कामे आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार करण्यात येत आहेत. या कामांतून देशामध्ये एक ‘मॅन्युफॅक्चरिंग हब’ बनविला जात आहे. जगातील नामांकित कंपन्या येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील, अशी अपेक्षा आहे. या संभाव्य गुंतवणुकीतून रोजगारनिर्मिती होऊन परिसरातील संपूर्ण ‘इकोसिस्टीम’ला चालना मिळेल.
 
 
‘मेसर्स क्रिश फूड इंडस्ट्रीज’ (इंडिया) व ‘मेसर्स ओडब्ल्यूएस एलएलपी ऑईल फिल्ड वेअरहाऊस प्रा. लि.’ या दोन कंपन्यांनी काही दिवसांपूर्वीच काम सुरू केल्याचे घोषित केले व कामाचा पहिला टप्पा पूर्ण केला. ‘डेव्हलपमेंट कमिशनर सीप्झ’ यांनी २४ जून, २०२० पासून उलाढाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत ‘सेझ’मध्ये १९ मध्यम व छोटे व्यवसाय (emeseme) आणि एका मुक्त व्यापार वेअरहाऊसिंगकरिता भूखंड दिले आहेत. ‘सेझ’चे काम झाल्यावर त्यात चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक व ५७ हजार रोजगारनिर्मिती होईल, अशी अपेक्षा जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी व्यक्त केली.
 
 
 
एलपीजी आवक विक्रमी
 
 
मुंबई शहर व उपनगरासह ठाणे, पालघर, रायगड, नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांना लागणार्‍या स्वयंपाकाच्या गॅसची ऑक्टोबरमध्ये १ लाख ०७ हजार ५३०.६७ दशलक्ष टन इतक्या एलपीजीची आयात झाली. हा विक्रमी असा आकडा आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये ९२ हजार ८७७ दशलक्ष टन एलपीजीची आवक झाली होती.
 
 
 
करंजा मत्स्यव्यवसाय बंदर विकास व ‘सेझ’मधून सव्वा लाख रोजगारनिर्मिती
 
 
 
“जेएनपीटी परिसरात उभारण्यात येणार्‍या ‘सेझ’मध्ये सव्वा लाख रोजगार निर्माण होणार असून, त्याचा लाभ कोकणातील तरुणांना होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास आणि नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. उरणच्या करंजा बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. आधीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गडकरी म्हणाले की, “प्रवासी जलवाहतुकीला प्राधान्य दिले जाईल. इंधनाचे दर कमी होण्याकरिता त्यात इथेनॉल वापरले जाईल. त्यातून प्रवास स्वस्त व वेगाने होऊ शकतो.”
 
 
 
तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले होते की, “बहुतेक देशांचा विकास सागरी व सामरिक शक्तींवर आधारित आहे. केंद्र सरकार ‘सागरमाला’ आणि ‘नीलक्रांती’ च्या माध्यमातून सागरी अर्थव्यवस्था बळकट करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे करंजा मत्स्यव्यवसाय बंदराचे काम हाती घेण्यात येणार आहे.”
 
 
 
मत्स्यव्यवसाय दहा हजार कोटींवर नेणार
 
 
या प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त फडणवीस म्हणाले होते की, “‘इंटिग्रेटेड फिशिंग हब’ उभारून निर्यातीची क्षमता वाढविण्यात प्रोत्साहन देण्यात येईल. सहा हजार कोटींचा व्यवसाय दहा हजार कोटींवर नेण्याचे लक्ष ठेवले आहे. मुंबईच्या ‘ससून डॉक’ या ब्रिटिशकालीन १८७५ मध्ये बांधलेल्या बदरातील मत्स्यव्यवसायावरील वाढता भार करंजा बंदर बांधून हलका करण्यात येईल. या बंदरात एक हजार मच्छीमार बोटींची मासळी उतरविण्यात येईल. त्याचप्रमाणे या परिसरात मासळीवर प्रक्रिया करणारे प्रकल्पही उभारण्यात येतील.”
 
 
 
पाच लाख टन क्षमतेचे वाढवण येथे बंदर उभारणार
 
 
 
डहाणूजवळ वाढवण येथे देशातील सर्वात मोठे व जगातील पहिल्या दहामध्ये मोडणारे बंदर विकसित करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारी २०२० मध्ये मंजुरी दिली. या बंदरविकासामुळे जेएनपीटी बंदरावरील भार कमी होणार आहे. त्या बंदराची क्षमता सध्या ५१ लाख कंटेनर (प्रत्येकी २० फूट एककांचे) आहे ती २०२५ पर्यंत एक कोटी कंटेनरपर्यंत नेली जाणार आहे. त्यामुळे सध्या २८ व्या स्थानात असलेल्या जेएनपीटी बंदराचे स्थान पहिल्या दहामध्ये येईल. मात्र, या बंदराला स्थानिक कोळीबांधवांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
 
 
 
 
समुद्रातील सुकी गोदी
 
 
कुठल्याही नौकेची पाण्याखालच्या भागाची दुरुस्ती अशा सुक्या गोदीत करता येते. नौकेला एका दुरुस्तीतळात आणले जाते. त्यानंतर सर्व पाणी बाहेर काढले जाते. विमानवाहू नौकेची दुरुस्तीही होऊ शकेल, अशी एक सुकी गोदी म्हणजे दुरुस्तीतळ मुंबईतल्या नौदल गोदीत उभारण्यात आला आहे. या नौदलाच्या गोदीकरिता जमीन उपलब्ध नसल्याने समुद्रात हा तळ उभारण्यात आला. तिन्ही बाजूंनी पाणी व एका बाजूने जमीन आहे. त्यामुळे हे गोदी बांधण्याचे काम जिकिरीचे झाले होते. या कामाला पूर्ण करण्यास तब्बल नऊ वर्षे लागली. २८ सप्टेंबर, २०१९ ला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. ही नौदलाची सर्वात मोठी सुकी गोदी मुंबईत बांधली आहे.
 
 
असे केले सुक्या गोदीचे बांधकाम
 
 
 
आधी दोन बाजूने ६.३ मी. लांब व ४.८ मी. रुंद मापाचे काँक्रीटचे ब्लॉक तयार केले व त्यांच्या साहाय्याने भिंती उभ्या केल्या. उर्वरित ठिकाणी तात्पुरते धरण बांधण्यात आले. यामुळे तेथे ५.६८ घनमी.ची खोली तयार झाली. त्यानंतर सुक्या गोदीचे काम सुरू केले. तिन्ही बाजूने पाणी रोखल्यावर उरलेल्या जागेतील पाणी बाहेर काढण्यात आले. ४५ हजार टनांहून अधिक गाळ तेथून काढण्यात आला. दगड फोडून व काँक्रीट टाकून तळ सपाट करण्यात आला.
 
 
नौकादुरुस्तीचे काम सुक्या गोदीत असे होते
 
 
 
नौका दुरुस्तीकरिता प्रथम सुक्या गोदीत आणली जाते. त्यानंतर समुद्राच्या दिशेने पाणी अडविण्यासाठी १,६०० टन वजनी केझन गेट दरवाजा (४५ मी. रुंद व २० मी.हून अधिक उंच) बंद करण्यात येतो. आतमधले २० कोटी लीटर पाणी आठ मोठ्या पंपांनी काढून टाकले जाते. सेकंदाला चार हजार लीटर या वेगाने गोदी अडीच तासांत पूर्ण सुकी बनते व दुरुस्ती पुरी झाल्यावर नौका बाहेर काढण्यासाठी गोदीमध्ये व्हॉल्व्ह उघडून पुन्हा पाणी भरले जाते. त्यासाठी दीड तास लागतो.
 
 

सुक्या गोदीची वैशिष्ट्ये
 
 
लांबी २८१ मी. रुंदी ४५ मी. उंची १६.५ मी.
 
 
आठ हजार टन पोलाद व पाच लाख टन काँक्रीट सामान लागले.
 
 
१,३०० कर्मचार्‍यांचे अहोरात्र काम व सात लाख तास खर्च झाले
 
.
सुक्या गोदीत एका वेळेला दोन मध्यम आकाराच्या नौका, दोन छोट्या पाणबुड्या किंवा एक विमानवाहू नौका उभे राहण्याची क्षमता आहे.
 
 
क्रेनच्या साहाय्याने दुरुस्तीची सोय होते.
 
 
योग्य तो वीजपुरवठा, अग्निशमन यंत्रणा व दुरुस्तीची यंत्रणा गोदीत उपलब्ध केली आहे.
 
 
अशातर्‍हेने ‘जेएनपीटी’ बंदराचा विकास भविष्यात अभिमानास्पदरीत्या होणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0