नऊ महिन्यांनंतर गडकरी रंगायतनमध्ये वाजली तिसरी घंटा

14 Dec 2020 18:05:41
rangaytan thane_1 &n







रसिकांची संपूर्ण काळजी घेत नाट्यगृहाचा पडदा उघडला



ठाणे: शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण खबरदारी घेत तब्बल ९ महिन्यानंतर रविवारी सायंकाळी गडकरी रंगायतन नाट्यगृहाचा पडदा उघडला आणि गडकरीची तिसरी घंटा वाजली. प्रदीर्घ काळाने नाटकाचा आस्वाद घेता आल्याने रसिक प्रेक्षकही हुरळुन गेले होते. कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत रसिकांनी नाट्यगृहात प्रवेश केल्याने गडकरी रंगायतन गजबजून गेले.
वाढत्या नागरीकरणात ठाणे महापालिकेच्या माध्यमातुन गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह ही दोन प्रशस्त नाट्यगृहे ठाण्याला लाभली आहेत. दर्जेदार नाटकांना नेहमीच ठाणेकर रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. कोरोनामुळे जवळपास नऊ महिने नाट्यगृहे बंद असल्याने रसिकांना नाटकाच्या प्रयोगांना मुकावे लागले होते. रसिकांची प्रतीक्षा रविवारी १३ डिसेंबर रोजी संपली आणि गडकरी रंगायतन नाट्यगृहाचा पडदा उघडला. ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकाचा प्रयोग रविवार, दुपारी ४.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये रंगला. तब्बल ४०७ रसिक या प्रयोगाला उपस्थित होते. कलाकारांबरोबर रसिकांनीही यावेळी आनंद व्यक्त केला.


सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी नाट्यगृहात एक खुर्ची सोडून बसण्याची व्यवस्था केली होती. नाट्यरसिकांना सोशल डिस्टन्स ठेवत प्रवेशद्वारावर रसिकांचे हात सॅनिटाइझ करत व मास्क परिधान करूनच नाट्यगृहात प्रवेश देण्यात आला. तसेच प्रयोगाच्या आधी आणि प्रयोग झाल्यानंतर संपूर्ण नाट्यगृह, नाट्यगृहाचा परिसर सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सुनेसुने झालेले गडकरी रंगायतन पुन्हा रसिकांनी गजबजले असल्याची माहिती नाट्यगृह व्यवस्थापनाने दिली.


Powered By Sangraha 9.0