मुलुंड टोलनाक्यावर मराठा आंदोलकांची नाकाबंदी

14 Dec 2020 18:41:17

maratha morcha_1 &nb








आनंदनगर जकातनाका व मुलुंड टोलनाका येथे सकाळपासूनच तपासणी सुरू






ठाणे: मुंबईच्या सीमेवरील ठाण्यात वाहतुक कोंडी नित्याचीच बाब आहे. सोमवारी हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मराठा समन्वयक संघटनांच्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी आनंदनगर जकातनाका आणि मुलुंड टोलनाका येथे सकाळपासूनच तपासणी सुरू केली. त्यामुळे २ कि.मी पर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच पावसाने रिपरिप सुरू केल्याने सकाळी १०.३० वाजेपर्यंत कोंडीचा हा त्रास ठाणेकरांना सहन करावा लागला.




कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईत होत आहे. तेव्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समन्वयक संघटनांनी अधिवेशनात धडकण्याचा निर्धार केला होता. या आंदोलकांना रोखण्यासाठी मुंबई व ठाणे पोलिसांनी मुंबईच्या सीमेवर बॅरीकेडस उभारून तपासणी सुरू केली. या तपासणीमुळे ठाण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.




कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपनगरीय रेल्वे वाहतूक सर्वसामान्यांसाठी अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत कामानिमित्त जाणाऱ्यांना स्वत:च्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यातच कोपरी रेल्वे पूल येथे रस्ता अरूंद असल्याने आणि सकाळी पडलेल्या पावसामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली.



Powered By Sangraha 9.0