सुरक्षारक्षक ते कलावंतापर्यंतचा नाट्यप्रवास

13 Dec 2020 18:52:37
suresh pawar _1 &nbs
 
 
 
 
 
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वरिष्ठ सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असणारे सुरेश पवार यांनी उत्तम कलावंतापासून लेखक, दिग्दर्शक आणि नेपथ्यकार अशा विविध भूमिका फुलविल्या आहेत. त्यांचा हा व्यक्तिवेध...
 
 
 
 
सुरेश पवार यांचे बालपण मुंबईच्या परळमधील भोईवाडा येथे गेले. त्यांचे शालेय शिक्षणदेखील परळचेच. पुढे त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पण, वयाच्या दुसर्‍या वर्षीच ते मातृसुखाला पारखे झाले. त्यांना भावंडंही नाहीत. वडीलही भाऊबंदकीला कंटाळून मुंबईत आले होते. मुंबईत आल्यानंतर या बापलेकांच्या डोक्यावर साधे छप्परही नव्हते. त्यामुळे फुटपाथवर त्यांना दिवस काढावे लागले. त्यांचे वडील चप्पल शिवण्याचे काम करीत होते. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी त्यावर मात करीत सुरेश यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
 
 
 
 
बालवयातच आईच्या प्रेमाला सुरेश मुकले असले तरी त्यांना वास्तव्य असलेल्या ठिकाणी घराघरात आपुलकी मिळाली. मायेची ऊब देणार्‍या शेजार्‍यांमुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. आचार-विचार, वाचन, चिंतन आणि मनन हे संस्कार त्यांच्यावर बालवयातच झाले. “भोईवाडा येथील त्या वातावरणामुळेच आपण घडलो. त्या वातावरणाचा जीवनातील जडणघडणीत खूप उपयोग झाला,” अशी प्रांजळ कबुली सुरेश देतात.
 
 
 
 
बालवयातच आईचे छत्र हरपलेले सुरेश बारावीला असताना त्यांचे पितृछत्रही हरपले. सुरेश यांच्यासाठी हा एक मोठा धक्काच होता. आई आणि वडील अशी दोघांचीही साथ सुटल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. या दु:खातून सावरत त्यांनी नातेवाईकांकडे राहण्याचा निश्चय केला. काही दिवस त्यांनी नातेवाईकांकडे काढले. सुरेश यांचा एक वेगळा संघर्ष येथून सुरू झाला. या काळात त्यांना आधार वाटावी, अशी एक मैत्रिणी त्यांच्या आयुष्यात आली.
 
 
 
 
स्मिता यांच्याशी सुरेश यांची ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मैत्री आणखी घट्ट झाली. सुरेश यांना पोलीस भरतीची संधी मिळाली. या भरतीत त्यांना यश आले. ते प्रशिक्षणासाठी रूजूही झाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपली जीवलग मैत्रीण स्मिता हिलाच आपली जीवनसाथी करण्याचे ठरविले.
 
 
 
 
सुरेश यांच्या आयुष्यात बालपणापासूनच संघर्ष वाट्याला आला. या संघर्षात नाट्यकलेची आवड त्यांना फारशी जोपासता आली नाही. जीवनात यशस्वितेचे एक एक मजले चढत असताना नाट्यकलेची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सुरेश हे 1994 मध्ये कडोंमपात सुरक्षारक्षक म्हणून भरती झाले आणि आता कडोंमपातच ते स्थिरस्थावर झाले आहेत. त्यांच्यातील नाट्यकला येथेच फुलली आणि बहरली. भिकू बारस्कर, वसंत शेलार, गजानन कराळे, गोपाळ हंस, दत्ता पांढरे, नाना शेळके यांच्याशी ओळख झाल्यानंतर त्यांच्या मदतीने त्यांना कडोंमपाच्या नाट्य विभागात काम करायची संधी मिळाली. या संधीचे त्यांनी सोनेही केले.
 
 
 
 
सुरेश हे सुरुवातीच्या काळात एकपात्री अभिनय स्पर्धेत सहभागी होऊ लागले. मुंबईत विविध ठिकाणी एका आठवड्यात पार पडलेल्या पाच एकपात्री अभिनय स्पर्धेत ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला होता. कडोंमपाने कामगार नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘निखारे’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिकही मिळाले. नाट्यकलेत ते एक-एक यशाचे शिखर सर करीत होते. राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा यात अभिनयाव्यतिरिक्त लेखन, दिग्दर्शनासाठीही त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
 
 
 
 
सुरेश पवार लिखित आणि दिग्दर्शित ‘अस्वस्थ नायक’ या नाटकाने ५५व्या राज्य नाट्यस्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविला. अभिनयाचे रौप्यपदकही सुरेश यांना मिळाले. यानंतर त्यांनी आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही. सुरेश यांनी संत रोहिदास यांच्या जीवनावर आधारित एक डीव्हीडी चित्रपट बनवला. यामध्ये त्यांनी ‘रोहिदासा’ची भूमिकाही सक्षमपणे साकारली. केवळ डीव्हीडी तयार करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी रोहिदासांचे चरित्र लिखित स्वरूपात राहावे, यासाठी लेखणीही हाती घेतली.
 
 
 
‘रायगडला जेव्हा जाग येते’ या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका वठवली. त्यांच्या ‘शेरखान’ व ‘हंबीरराव’ या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच स्मरणात राहिल्या. सुरेश यांनी अनेक कलावंत घडविले आहेत. ५८व्या राज्य नाट्यस्पर्धेत ‘नवा सूर्य’ या त्यांच्या नाटकाने देदीप्यमान यश मिळविले. या नाटकाला कल्याण केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. या नाटकाने सांघिक प्रथम क्रमांकासह, नेपथ्य, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, रंगभूषा, पुरूष आणि स्त्री रौप्यपदक आणि अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र या सर्वच विभागात प्रथम क्रमांक मिळविला होता.
 
 
 
 
सुरेश यांची विद्यार्थिनी पूनम कुलकर्णी हिला ‘नवा सूर्य’ या नाटकात अभिनयाचे रौप्यपदक मिळाले. सुरेश यांनी ‘निखारे’, ‘अस्वस्थ नायक’, ‘बाळू कासारचा घोडा’ आणि ‘नवा सूर्य’ या नाटकासाठी सर्वोत्कृष्टअभिनयाचे रौप्यपदक पटकाविले आहे. सुरेश यांनी आपल्यासह आपल्या विद्यार्थ्यांचीही नाट्यकला कशी बहरेल, याचा सातत्याने विचार केला. विद्यार्थी जेव्हा यश प्राप्त करतो, तेव्हा खरा आनंद हा गुरूला होतो. पूनमच्या यशाने तोच आनंद सुरेश यांनाही झाला.
 
 
 
 
सुरेश यांनी ‘तुम्हीच ठरवायचं’, ‘मन पांगळं पांगळं, ‘शोध बाई शोध’, ‘बघ आपल्यालाही असंच नाचायचंय,‘ ‘अशी ही चुंबकचुंबी’, ‘चिमटा’ अशी अनेक नाटके लिहून त्यांचे दिग्दर्शनही केले. ‘मौनप्रपात’, ‘निखारे, ‘महाभोजन तेराव्याचे, ‘चौकातील विहीर’, ‘दुसरा अंक’, ‘दुसरी गीता’, ‘जल गई पतंग’, ‘भस्म्या’ अशा अनेक नाटकांतून त्यांनी आपल्या अभिनायाची चुणूकही दाखविली. त्यांचा व्यसनमुक्तीवरही चारोळी संग्रह प्रकाशित झाला आहे. विविध विषयांवर एक हजारांहून अधिक पथनाट्यांचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. सुरेश यांचा महापालिकेने आजवर चार वेळा सन्मान केला आहे, हीच त्यांच्या कलेला मिळालेली खरी पोचपावती म्हणावी लागेल. दै.‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा!



- जान्हवी मोर्ये 
Powered By Sangraha 9.0