ब्रह्मपूरीत सापडला वाघाचा मृतदेह; यंदा राज्यात १७ वाघांचा मृत्यू

12 Dec 2020 14:16:51
tiger_1  H x W:

दोन वाघांच्या लढाईत मृत्यू ? 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - चंद्रपूरमधील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात आज सकाळी वाघाचा मृतदेह आढळून आला. हा वाघ ५ ते ६ वर्षांचा असून दोन वाघांच्या लढाईत त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. यंदा राज्यात १७ वाघांनी आपला जीव गमावला आहे.
 
 
ब्रह्मपुरी वनविभाग सिंदेवाही वनपरिक्षेत्र नवरगाव क्षेत्र कार्यालय रत्नापुर येथे आज सकाळी ९ वाजता वाघाचा मृतदेह सापडला. हा वाघ नर प्रजातीचा आहे. वनरक्षक गस्तीवर असताना खांडला गावाच्या जवळ मुख्य रस्त्याच्या बाजूला १०० मीटर अंतरावरील परिसरात पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आला. आपले क्षेत्र प्रस्थापित करण्यासाठी दोन वाघांमध्ये लढाई झाली असावी. यामध्येच या वाघाचा मृत्यू झाल्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणा'च्या (एनटीसीए) 'टायगरनेट' या संकेतस्थळानुसार यंदा राज्यात एकूण १७ वाघांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात १५ दिवसांमध्ये तीन वाघांचा मृत्यू झाला होता. या घटना शिकारीच्या होत्या. यामध्ये ताडोबातील 'मयुरी' नामक वाघिणीबरोबर ब्रम्हपूरीमध्ये एका वाघाला विजेचा धक्का देऊन मारण्यात आले होते. तसेच गोंदियामध्ये कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या वाघाचे अवयव गायब होते. 

Powered By Sangraha 9.0