संकटग्रस्त 'तणमोरा'ची भरारी; राजस्थान ते महाराष्ट्र ६०० किमीचे स्थलांतर

12 Dec 2020 15:18:37

bird_1  H x W:


सॅटलाईट टॅगव्दारे शास्त्रज्ञांची नजर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - 'भारतीय वन्यजीव संस्थान'ने (डब्लूआयआय) आॅगस्ट महिन्यात राजस्थानमध्ये सॅटलाईट टॅग लावलेल्या 'रवी' नामक तणमोर (Lesser Florican) पक्ष्याने महाराष्ट्रात स्थलांतर केले आहे. पाच महिन्यांमध्ये जवळपास ६०० किमीपेक्षा अधिक अंतर कापून हा पक्षी सध्या औरंगाबादमध्ये वस्तीला थांबला आहे. या पक्ष्याच्या स्थलांतराने औरंगाबाद जिल्ह्यातील गवताळ प्रदेशांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. 
 

bird_1  H x W:  
 
 
देशात गवताळ प्रदेशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे या प्रदेशांमध्ये अधिवास करणारे 'बस्टर्ड' प्रजातीचे पक्षी संकटात सापडले आहेत. 'बस्टर्ड' जातीमधील एकूण चार प्रजाती भारतामध्ये आढळतात. यामध्ये माळढोक, तणमोर, बंगाल फ्लाॅरिकन आणि भारतात केवळ हिवाळ्यात स्थलांतर करणाऱ्या मॅकविन्स बस्टर्ड या पक्ष्यांचा समावेश आहे. त्यातही तणमोर हा पक्षी भारतासाठी प्रदेशनिष्ठ आहे. म्हणजेच केवळ भारतामध्ये त्यातही केवळ गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये त्याचा अधिवास आहे. हा पक्षी 'बस्टर्ड' जातीमधील आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. त्यामुळे तणमोराचे स्थलांतर आणि विणीव्यक्तिरिक्त त्यांच्या इतर अधिवास क्षेत्रांचा मागोवा घेण्याकरिता 'डब्लूआयआय'चे संशोधन सुरू आहे.
 
 
 
 
 
या संशोधनकार्याअंतर्गत आॅगस्ट, २०२० मध्ये 'डब्लूआयआय'च्या शास्त्रज्ञांनी राजस्थामधील अजमेर येथे तणमोरांना सॅटलाईट टॅग लावले होते. देशात तणमोर प्रजातीच्या संशोधनास प्रारंभ करणारे डाॅ. रवी शंकरन यांच्या नावावरुन टॅग केलेल्या एका तणमोराचे नाव 'रवी' ठेवण्यात आले. या रवीने गेल्या पाच महिन्यांमध्ये राजस्थानवरुन महाराष्ट्रात ६०० किमीहून अधिक स्थलांतर केल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे. सध्या हा पक्षी औरंगाबादमध्ये वास्तव्यास आहे. तणमोर पक्ष्याचा जुलै ते आॅगस्ट हा पावसाळी हंगाम विणीचा कालावधी आहे. तीन वर्षांपूर्वी भारतीय वन्यजीव संस्थान, दी काॅर्बेट फाऊंडेशन आणि बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांनी केलेल्या सर्वेक्षणाअंती भारतात केवळ ७०० तणमोर अस्तित्त्वात असल्याचा निष्कर्ष काढला होता. 
Powered By Sangraha 9.0