समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

    दिनांक  12-Dec-2020 12:47:01
|

sea turtle _1  


गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी

 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या समुद्री कासव विणीच्या संरक्षणार्थ गुहागर किनाऱ्यावरील जेट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (एमसीझडएमए) जेट्टीच्या उभारणीसाठी मागितलेल्या 'किनारी क्षेत्र नियमन'ची (सीआरझेड) परवानगी नाकारली आहे. या किनाऱ्यावर होणाऱ्या सागरी कासवांच्या घरट्यांचे कारण देऊन जेट्टीच्या उभारणीला नकार देण्यात आला आहे. 
 
 
 
 
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत राज्याच्या किनारपट्टीवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. यामध्ये कासवांची सर्वात जास्त घरटी ही गुहागर किनाऱ्यावर होतात. या किनाऱ्यावर २०१८ मध्ये ३४, २०१९ मध्ये २३ आणि यंदा २०२० मध्ये २७ घरटी आढळली. यंदा या किनाऱ्याहून १ हजार १३१ कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुहागर किनाऱ्यावर वाहतूकीसाठी जेट्टी बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. जेट्टीसाठी 'सीआझेड'ची परवानगी घेण्याकरिता हा प्रस्ताव 'एमसीझेडएमए'कडे पाठविण्यात आला होता. मात्र, २४ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या 'एमसीझेडएमए'च्या १४८ व्या बैठकीत हा जेट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. 
 
 
 
 
नुकतेच प्रसिद्ध झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, समितीच्या सदस्यांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला. जेट्टीच्या उभारणीमुळे गुहागर किनाऱ्यावर होणाऱ्या कासव विणीला बाधा पोहोचण्याच्या चिंतेने हा प्रस्ताव रद्द करत असल्याचे इतिवृ्तात म्हटले आहे. वन विभागाच्या कांदळन कक्षाच्या अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी पत्र लिहून याविषयी आक्षेप नोंदवला होता. त्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला. 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.