गेल्या सात महिन्यांत चीनने काय कमावले आणि काय गमावले?

    दिनांक  12-Dec-2020 21:05:40   
|

China_1  H x W:
 
 
चिनी अतिक्रमणाला सात महिने पूर्ण झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये भारत-चीन संबंधांमध्ये प्रत्येक आघाडीवर चीन पिछाडीवर आहे. लष्करीदृष्ट्या चीनने काहीही साध्य केले नाही. त्याशिवाय चीनची अपेक्षा होती की, गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा भाग नाही, त्यावर भारत पुन्हा दावा करणार नाही. मात्र, असे झाले नाही.
 
 
 
चीनचे जनरल झाऊ यांनी डोकलाम आणि सध्याच्या आक्रमणाचे नेतृत्व केले होते. त्यांना अशी विचारणाही करण्यात आली की, गेल्या सात महिन्यांत लष्करीद़ृष्ट्या तुम्ही काय कमावले? त्याचे थोडक्यात उत्तर आहे की, देप्सांगमध्ये चिनी सैन्याने भारतीय सैन्याची गस्त थांबविली असली, तरीही पेंगाँग त्से लेकच्या दक्षिणेकडे चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर पिछाडीवर गेले आहे. थोडक्यात, लष्करीदृष्ट्या चीनला काहीही साध्य करता आलेले नाही.
 
 
गेल्या अनेक महिन्यांपासून चीन मोठ्या प्रमाणात दुष्प्रचार युद्ध भारताबरोबर करत आहे. भारतातील काही वर्तमानपत्र चीनकडून पैसे मिळाल्यामुळे चीनची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, त्याचा भारतीय सरकारवर, लष्करावरही काही परिणाम झाला नाही. भारतीय जनताही चीनच्या १०० टक्के विरोधात आहे. भारत-चीन संबंध हे गेल्या अनेक वर्षांमध्ये सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत. भारत अत्यंत पद्धतशीरपणे चीनविरुद्ध वेगवेगळ्या स्तरावर आक्रमक कारवाई करत आहे.
 
 
बहुतेक देश चीनच्या विरोधात
 
 
जोपर्यंत जगाचा प्रश्न आहे, तोपर्यंत चीनने केलेल्या एका सर्व्हेप्रमाणे असे दिसते की, पाकिस्तान सोडून बहुतेक सर्वच देश चीनच्या विरोधात उभे आहेत. अनेक देश आर्थिक कारणामुळे चीनविरोधात बोलायला तयार नव्हते. उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलियासारखे देशही आता उघडपणे चीनच्या विरोधात बोलत आहेत.
 
 
तंत्रज्ञान क्षेत्रात चीनची पीछेहाट झाली आहे. गेल्या काही महिन्यांत २९० चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. भारताने चिनी सॉफ्टवेअर, हार्डवेअर, अ‍ॅप्सवर बंदी घालायला सुरुवात केली. तेच उदाहरण बघून अमेरिका आणि युरोपमधल्या अनेक देशांनीही त्याची री ओढली आहे. त्यामुळे भारताच्या नेतृत्वाखाली चिनी तंत्रज्ञानाविरुद्ध उघडलेल्या आघाडीमध्ये चीनची पीछेहाट झाली आहे. चीनची फाय-जी तंत्रज्ञान पुरविणारी सर्वात मोठी कंपनी ‘हुवावे’ला अमेरिका, युरोप आणि इतर देशांनी माघारी धाडले आहे.
 
 
तैवानवर हल्ला करण्याचा चीनचा प्रयत्न होता. परंतु, त्या प्रयत्नातसुद्धा फार तथ्य राहिले नाही. तैवानने आपली लष्करी ताकद मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. एवढेच नव्हे, तर भारताने चीनचा प्रथम क्रमांकाचा शत्रू जपान, तैवान यांच्याशी आपले संबंध मजबूत केले आहेत. ऑस्ट्रेलिया चीनचा शत्रू आहे. पुढील दहा वर्षे तरी ऑस्ट्रेलिया स्वतःची संरक्षण सिद्धता घसघशीत ४० टक्क्यांहून जास्त प्रमाणात वाढविणार आहे. जपाननेसुद्धा आपल्या लष्करी खर्चामध्ये मोठी वाढ करण्याचे ठरविले आहे. हे चीनच्या विरोधातच आहे.
 
 
चीनविरोधात सामरिक, तंत्रज्ञान आणि गुप्तहेर माहिती संबंध सुधारले
 
 
चिनी आक्रमक कारवायांमुळे भारत-अमेरिका यांचे संबंध उच्च पातळीवर पोहोचले आहेत. अनेक प्रकारचे तंत्रज्ञान, गुप्तहेर माहितीची देवाणघेवाण, सामरिक मदत आतापर्यंत अमेरिका देत नव्हती, ती सर्व मदत आता भारताला दिली जाते आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चार मोठी राष्ट्रे अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील केवळ संरक्षण संबंध सुधारले नाहीत, तर सामरिक संबंध, तंत्रज्ञानाचे संबंध आणि गुप्तहेर माहिती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. जपानने आता फ्रान्स आणि अमेरिकेबरोबर चीनविरोधात पूर्व चिनी समुद्रात युद्ध अभ्यास सुरू केला आहे.
 
 
अमेरिका आतापर्यंत स्वतःला जगापासून वेगळा करण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, आता अमेरिका दक्षिणपूर्वेकडील लहान-लहान देशांबरोबर उभा राहत आहे. कारण, फिलिपिन्ससारखे देश चीनच्या विरोधात असले, तरीही लष्करी ताकदीअभावी ते चीनविरोधात पाऊल टाकत नव्हते. परंतु, अमेरिकेने पाठविलेल्या युद्धनौकांमुळे दक्षिण पूर्वेकडील देशांनी चिनी आक्रमकतेविरुद्ध बोलायला सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे, तर इतर लहान देश म्हणजे मालदीव, नेपाळ या देशांमध्येसुद्धा अमेरिकेने प्रवेश केल्याने भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये झालेली चिनी घुसखोरी कमी होण्यास मदत होईल.
 
 
चिनी सैन्य म्हणजे कागदी वाघ
 
 
चीनने त्यांचे सैन्य दुसर्‍या क्रमांकाचे सैन्य आहे, अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे, असा दावा केला होता. मग त्यांना लढाई का करता आली नाही? गलवानमध्ये त्यांची धुलाई झाल्यानंतर चीन लष्करीद़ृष्ट्या शांत बसलेला आहे. कारण, चिनी सैन्याची भारतीय लष्कराशी भिडण्याची हिंमत नाही. महत्त्वाचे म्हणजे, चिनी सैन्य कागदी वाघ आहेत. त्यांना लढण्याचा अनुभव नाही. त्यांना फक्त स्वतःच्या कमजोर नागरिकांविरोधातच कारवाई करता येते जसे की, तिबेट, शिनजियांग, मंगोलिया वगैरे. चीनचे ७० टक्के सैन्य हे एकटे मूल असलेल्या कुटुंबातील आहेत. घरातच खूप कौतुक वाट्याला आलेले मूल असल्याने ते शारीरिकद़ृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, लष्कराचे अवघड करिअर करण्यास घाबरतात. चिनी सैन्य हे शारीरिक तंदुरुस्तीच्या मुद्द्यावर अतिशय मागे आहेत. त्यामुळे तिबेट आणि हिमालयातील अत्यंत थंड वातावरणात काही करायची क्षमता नाही.

कम्युनिस्ट पक्षाविषयी राग
 
 
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाविरोधात चीनमध्ये राग आहे. ज्या चिनी नागरिकांची मुले सैन्यात आहेत, त्यांना वाटते की, विनाकारण त्यांच्या मुलांना चिनी नेतृत्वाच्या आक्रमकतेचा त्रास होत आहे. कोणताही चिनी नागरिक आपल्या मुलाचा लढाईमध्ये बळी देण्यासाठी तयार नाही. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे नेतृत्व हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत, त्यांना मिळणारी पदोन्नती ही ते राजकीय कम्युनिस्ट पक्षाच्या किती जवळ आहेत, त्यावर अवलंबून आहे. त्यांची लढण्याची क्षमता काय, लष्करी क्षमता यावर काहीही अवलंबून नाही. त्यामुळे चिनी सैन्याचे वरचे नेतृत्व हे लष्करी कमी आणि राजकीय नेतृत्व अधिक आहे.
 
 
जे चीन सैनिक निवृत्त झाले, त्यांच्यातही कम्युनिस्ट पक्षाविषयी राग आहे. कारण, त्यांना पुरेसे निवृत्तीवेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांची परिस्थिती खालावली आहे. सध्या सैन्यात असलेल्या तरुणांचे पालकही नाराज आहेत. कारण, जे चिनी सैनिक गलवानमध्ये ठार झाले, त्यांना कोणताही मान चिनी सरकारने दिला नाही. चीनचे ‘प्रपोगंडा वॉर’ हे त्यांच्या स्वतःच्या सैनिकांचे मनोबल वाढविण्यामध्ये कमी पडत आहे.
 
 
सध्या कोणताही मोठा देश चीनबरोबर युद्धाभ्यास करायला तयार नाही. त्यामुळे अत्याधुनिक लढाईचा सराव नाही. उत्तर कोरिया, पाकिस्तान हे देश वगळता कोणत्याही इतर देशांबरोबर लष्करी सरावाचा अनुभव नाही. चिनी सैन्याचा २० टक्के प्रशिक्षणाचा वेळ हा कम्युनिस्ट पक्षाचे तत्त्वज्ञान शिकण्यातच जातो. त्यामुळे त्यांचे लष्करी प्रशिक्षण कमी पडते.
 
चीनची आक्रमकता कमी होईल का?
 
एकाच वेळी चीनने दक्षिण चीन समुद्रात भारत, तैवान, जपान यांच्याविरोधात आक्रमक कारवाई करायला सुरुवात केल्याने चीनची सर्वच आघाडीवर माघार झाली आहे. सर्वच राष्ट्रे जी चीनच्या आक्रमक आर्थिक घुसखोरीमध्ये अडकली, ती स्वतःला चीनपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे. थोडक्यात, चीनने भारताविरोधात लडाखमध्ये जी आक्रमक कारवाई सुरू केली होती, त्यात त्यांना सर्वच स्तरांमध्ये अपयश येत आहे. त्यामुळे सर्वच स्तरांमध्ये चिनी सरकारविरोधात राग आहे. म्हणजे हा राऊंड भारताने जिंकला आहे. 
 
 
 
अर्थात, येत्या काळात चीनची आक्रमकता कमी होईल आणि चिनी सैन्य लडाखमधून परत जाईल का? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. कारण, चीन लडाखमधून मागे हटणार नाही. त्यामुळे भारताला लडाख सीमेवर असलेल्या आपल्या सैन्याची ताकद वाढवावी लागेल. सैन्याचे आधुनिकीकरण सुरू ठेवावे लागेल. कारण, चिनी सैन्य पुन्हा आक्रमक होऊ शकते, त्यासाठी आपल्याला तयार राहावे लागेल. येत्या काळात आपली युद्धक्षमता वाढविणे गरजेचे आहे. आपल्या मित्रराष्ट्रांची एक फळी निर्माण करायला पाहिजे. चीनच्या ‘हायब्रिड वॉर’ला उत्तर देण्यासाठी भारताच्या विविध राष्ट्रीय ताकदीचा वापर करून चीनला आक्रमकरीत्या उत्तर द्यायला पाहिजे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.