साप-सरड्यांना रस्ता ओलांडण्यासाठी उत्तराखंडमध्ये बांधला गवत-बांबूचा पूल

01 Dec 2020 18:25:15
wildlife _1  H

उत्तराखंड वन विभागाची शक्कल 

मुंबई (प्रतिनिधी) - रस्ते अपघातात जीव जाणाऱ्या वन्यजीवांचा विचार करुन उत्तराखंडमधील रामनगर वनपरिक्षेत्रात प्राण्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पूल तयार करण्यात आला आहे. बांबू आणि गवतापासून तयार केलेल्या या पुलाचा फायदा सरीसृप आणि लहान प्राण्यांना होणार आहे. अशा प्रकारच्या पुलाला 'कॅनाॅपी ब्रिज' म्हटले जाते. 
 
 
दरवर्षी रस्ते आणि रेल्वे अपघातात हजारो वन्यजीवांचा जीव जातो. वनक्षेत्रांना छेदून जाणाऱ्या रस्त्यांवर ही संख्या जास्त असते. याच अनुषंगाने विचार करुन उत्तराखंड वन विभागाने प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र असलेल्या नैनीतालच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर वन्यजीवांसाठी एक पूल तयार केला आहे. या रस्त्यावर पर्यटकांच्या वाहनाच्या धडकेत अनेक वन्यजीवांचा जीव गेला आहे. त्यामुळे वन विभागाने विचार करुन रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या झाडांना जोडणारा एक पूल तयार केला. बांबू, गवत आणि ज्यूटच्या कापडापासून ९० फूटांचा हा पूल तयार करण्यात आला. वन अधिकारी शेखर जोशी यांनी सांगितले की, “या रस्त्यावर अनेक सरपटणारे प्राणी आणि इतर लहान प्राणी पर्यटकांच्या वाहनांमुळे ठार झाले आहेत. त्यामुळे हा पूल तयार करण्यात आला असून पुलांवरुन जाणाऱ्या प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पूलाच्या दोन्ही बाजूला कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत." 
 
 
या पुलाकडे प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी वनाधिकारी आता त्यावर वेली आणि गवत वाढवत आहेत. येथील घनदाट जंगलात हत्ती, बिबट्या, हरिण यांसारख्या प्राण्यांचा अधिवास आहे. वाहनचालक अशा मोठ्या प्राण्यांना काही अंतरावरुन पाहू शकतात आणि वाहनाचा वेग कमी करुन थांबू शकतात. मात्र, साप, सरडे, रान किंवा उद्मांजर या प्राण्यांच्या बाबतीत तसे घडत नाही. बऱ्याचदा या छोट्या प्राण्यांचा गाडीखाली येऊन जीव जातो. त्यामुळे अशा 'कॅनाॅपी' पूलाच्या माध्यमातून लहान वन्यजीवांचे संरक्षण करण्यास मदत होते.
 
 
Powered By Sangraha 9.0