
मंदिर प्रशासनाकडून भाविकांना विनंतीवजा सूचना
शिर्डी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता मंदिरं खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला. मंदिरं खुली झाल्यानंतर भाविकांनी ठीक- ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. पण शिर्डी येथे काही भाविकांना मात्र भारतीय पेहेरावात नसल्याने प्रवेश नाकारला गेला. आणि यापुढे ह्याच नियमांतर्गत भारतीय पेहेराव केलेल्या व्यक्तीलाच श्री क्षेत्र शिर्डी येथे प्रवेश देण्यात येईल असे, मंदिर प्रशासनाने जाहीर केले.
शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी देश - विदेशातूनसुद्धा भाविक येत असतात. येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनास यावं असा आग्रह मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तातडीने सक्ती करण्यात आलेली नसली तरीही या निर्णयासंबंधीचे सूचना फलक मात्र मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. हे फलक तीन भाषांमध्ये लावण्यात आले असून, भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीवजा मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली आहे.
काही भाविकांनी या निर्णयाचं स्वागत केलं; तर काही भक्तांनी आपली नाराजीही व्यक्त केली. म्हणजेच एकंदरीत शिर्डी देवस्थानच्या परिसरात येताना भारतीय पेहेरावात नसल्यास प्रवेश नाकारला जाईल या निर्णयाबाबत भक्तगणांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.