मुंबई : नागरिक, लोकप्रतिनिधी,प्रशासन, स्वयंसेवी संस्था सर्वांनी जर कृतिशील संकल्प केला तर नवी मुंबई शहर स्वच्छ भारत अभियानात नक्कीच प्रथम क्रमांक पटकावेल, असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानाअंतर्गत ग्रीन होप, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट आणि मध्य रेल्वे यांच्या संयुक्त वतीने रेल्वे स्थानक परिसरांमध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ लोकनेेते आ.नाईक यांच्या शुभहस्ते मंगळवारी कोपरखैरणे स्थानक परिसरात झाला. त्यावेळी उपस्थितांसमोर त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात कोरोना विषयक खबरदारीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. मध्य रेल्वे मंडळ, संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट, एनएसएस, विविध स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, नागरिक या सर्वांच्या विद्यमाने ही मोहिम पार पडणार आहे.
माजी खासदार डाॅ.संजीव नाईक, ग्रीन होपचे अध्यक्ष तथा माजी आमदार संदीप नाईक, पालिकेच्या घणकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष गुप्ता, गौरव झा, मोहित सिंग, संदीप तिवारी, निरज झा, शंकर नारायण, श्रमिक शिक्षण मंडळाचे सचिव सुरेश दादा नाईक या मान्यवरांसह माजी नगरसेवक, ज्यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे त्यांचे प्रतिनिधी शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भारत स्वच्छ सर्वेक्षण अभियानात मागील वर्षी नवी मुंबईला महाराष्ट्रात पाहिला आणि देशात तिसरा क्रमांकाचा बहुमान मिळाला. या यशावर समाधानी न राहता देशात पाहिला नंबर येण्यासाठी नवी मुंबईतील सर्व घटकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोकनेते आ. नाईक यांनी केले. नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांचा ताबा सिडकोकडे आहे. मात्र स्वच्छता व देखभालीकडे सिडकोचे दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. या विषयी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहिणार आहे. लवकरच सिडको, नवी मुंबई पालिका, एमआयडीसी, एमएमआरडीए, पिडब्ल्यूडी अशा सर्वच सरकारी व निमसरकारी विभागांची संयुक्त बैठक घेवून नवी मुंबईतील स्वच्छता व देखभालीबददल चर्चा करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वच्छतेबरोबर सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज असल्याचे नमूद केले.
कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाउनच्या काळात प्रषासकीय यंत्रणांना काहीशी मरगळ आली होती. ती झटकून टाकणे आवश्यक होते, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी या प्रसंगी मांडले. स्वच्छता राखून आपण कोरोनाला दूर ठेवू शकतो. भारत स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षी देशात पहिला नंबर प्राप्त करायचा असेल तर स्वच्छता ही कुणा एकाची नसून सर्वांची जबाबदारी आहे हे ध्यानात घ्यायला हवं, स्वच्छता एका दिवसासाठी नाही तर कायमची सवय बाळगावी, असा सल्ला त्यांनी दिला. रेल्वे स्थानकांच्या देखभालीकडे सिडकोचे लक्ष नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. दुसऱ्यांकडे बोट दाखविण्यापूर्वी आपण स्वच्छतेचे काम स्वतःपासून सुरू करायला हवे. त्या भुमिकेतून हे स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणांनी देखील त्यांची जबाबदारी ओळखून वेळीच काम केले पाहिजे. सध्या ही मोहिम नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानका परिसरापुरती मर्यादित असली तर भविष्यात ती संपूर्ण नवी मुंबई शहरात राबविण्याचा माजी आमदार संदीप नाईक यांचा मनोदय आहे.
काय आहे अभियान
नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, वाशी, जुईनगर, नेरूळ, सीवूड दारावे, बेलापूर या रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर डोंगर भाग, एमआडीसी, षहर, गाव, झोपडपटटी, खाडीकिनारा अशा सर्वच भागात ही मोहिम पार पडणार आहे. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.