धक्कादायक! कोविडमुळे शहीद १४६ कर्मचारी मदतीविना

01 Dec 2020 19:14:31
covid yoddha_1  
 
 
 
 


मुंबई : कोविड संसर्गामुळे शहीद झालेल्या मुंबई महापालिकेच्या २५ कर्मचाऱ्यांच्या वारसांनाच अजूनपर्यंत सानुग्रह साह्याचा लाभ झाला आहे. कोविडशी सामना करताना १७१ कामगार-कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, अजून १४६ कामगार सानुग्रह साह्यापासून वंचित असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
 
 
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि महापालिकेच्या आरोग्ययंत्रणेची तारांबळ उडाली. मात्र नागरिकांचे जीव वाचवायचे याच ध्यासाने पालिका आरोग्य यंत्रणा आणि इतर खात्याचे कर्मचारी सुद्धा कामाला लागले. मात्र नागरिकांचे प्राण वाचवता वाचवता पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाच कोरोनाचा विळखा पडला.
 
 
यात एच ईस्ट विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार, उपायुक्त शिरीष दीक्षित यांच्यासह यांच्यासह पालिकेच्या १७१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोनाशी लढता लढता धारातीर्थी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे विमा सुरक्षाकवच पालिकेने देण्याचे जाहीर केले होते. मात्र त्यापैकी अजूनपर्यंत फक्त २५ जणांनाच त्याचा लाभ झाला आहे.
 
 
सानुग्रह साह्य मिळवण्यासाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांकडून संबंधित खात्यामार्फत ६४ दावे दाखल झाले. त्यापैकी २५ जणांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह साह्य देण्यात आलेले आहे. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत १२ कोटी ५० लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र अनेक दाव्यांमध्ये कागदपत्रांची पूर्तता नसल्याने, काही दाव्यांमध्ये त्रुटी असल्याने ते दावे प्रलंबित आहेत, असे माहिती अधिकारात स्पष्ट करण्यात आले आहे.



Powered By Sangraha 9.0