आत्महत्या नाही, तर जगणे महत्त्वाचे!

09 Nov 2020 22:35:01

prasad mohite_1 &nbs



आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या मुलानेच त्याच्याचसारख्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांसाठी सेवाकार्य उभे करणे याला खूप महत्त्वाचे भावनिक आणि सामाजिक आयाम आहेत. हे काम उभे केले आहे सोलापूरच्या प्रसाद मोहिते यांनी. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...



शेतकर्‍यांनी केलेली आत्महत्या. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातल्यांचे काय होत असेल? त्याची विधवा पत्नी किंवा वृद्ध आई, त्याची मुलबाळं, या सार्‍यांच्या दैनंदिनीवर काय परिणाम होत असेल याची कल्पना न केलेली बरी. आत्महत्या केलेल्या शेेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सुटतात का? या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या बार्शी तालुका आणि त्याच्या आसपासच्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी प्रसाद मोहितेंचे सेवाकार्य अतुलनीय आहे. आत्महत्या केलेल्या १२० कुटुंबीयांना ते सर्वतोपरी मदत करत आहेत. प्रसाद यांचे शिक्षण ‘एमएसडब्ल्यू’पर्यंत झाले असून, सेवाकार्यासाठी त्यांना ४००च्यावर पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, या सर्व पुरस्कारांसाठी त्यांनी कधीही स्वतःहून अर्जबिर्ज केले नाहीत, तर त्यांच्या कार्यांचा लौकिक एकून स्वतः लोक त्यांच्याकडे येतात. असं काय बरं प्रसाद करत असतील? तर त्याचे मूळ त्यांच्या जीवनकहाणीत आहे.


मूळच्या इर्लेवाडी-बारशी, सोलापूरचे मोहिते कुटुंब. विठ्ठल मोहिते आणि संगिता मोहिते यांचे सुपुत्र प्रसाद. विठ्ठल हे हाडाचे शेतकरी. त्यांची सात एकर जमीन. त्यापैकी दोन एकर जमीन दोन लेकींच्या लग्नासाठी विकली. जातीच्या मराठ्याने इज्जत राखावी, माणूस कमवावा, गरिबाची कणव ठेवावी, असे त्यांचे मत. विठ्ठल यांचा दुग्ध संकलन करून डेअरींना विकण्याचाही जोडधदां होता. दूध संकलन करणारे शेतकरी, विठ्ठल यांच्याकडून उचल घ्यायचे. मात्र, त्यावेळी दूध डेअरीकडून पैसे आलेले नसायचे. बरं मोहिते कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप चांगली नव्हतीच, शेतजमीन होती. पण, अवर्षणामुळे शेती नापीक झालेली, त्यामुळे घर चाले ते डेअरीच्या दूध संकलनावर. डेअरीकडूनही वेळेत पैसे मिळत नसत. त्यामुळे घरखर्चाचे पैसे विठ्ठल त्या शेतकर्‍यांना देत. मग घरातले विठ्ठल यांना म्हणत, “आपल्यालाच भाकरीवर कोरड्यास मिळायची ददात आहे, मग तुम्ही त्यांना का पैसे दिले.” विठ्ठल म्हणत, “आपल्याकडं भाकरी तरी आहे, काय माहिती त्याच्याकडं ती पण नसेल.” आपले वडील स्वतःच्या हातातला घास दुसर्‍याला देतात, हे सर्व प्रसाद पाहत असत, अशातच विठ्ठल यांनी ठरविले की, पावसावर अवलबंल्यामुळे शेतीचे नुकसान होते, आता बोअर खणायची. त्यासाठी बँकेकडून त्यांनी कर्ज घेतले. पण, पाच वेळा वेगवेगळ्या जागी बोअर खणूनही विहिरीला पाणी लागले नाही. बोअर बनवून शेती पिकविण्याच्या नादात गावातल्या सावकारांचे कर्ज झाले, बँकेचे कर्ज, व्याज फेडू शकले नाहीत. शेती नाही, तर कर्ज फेडणार कसे? त्यातच बँकेची सक्त वसुलीची नोटीस येऊ लागली. कर्ज, व्याज फेडले नाही तर पुरख्यांच घर, शेतजमीन लिलाव करून विकली जाईल, असे आप्त नातेवाईक म्हणू लागले. त्या धास्तीने विठ्ठल यांनी आत्महत्या केली.


इथूनच प्रसाद यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. विठ्ठल यांचे कर्ज फेडावे लागेल, विधवा पत्नी आणि मुलाला मदत करावी लागेल म्हणून एक-एक नातेवाईक दूर जाऊ लागला. सरकारी एक लाख रुपयांची मदत मिळाली. ती मिळविण्यासाठीची कागदपत्रं तयारी १४ वर्षांच्या प्रसाद यांनीच केली. त्यावेळी तीन हजार रुपये लाच दिल्यानंतर एक लाख रुपयांचा धनादेश संगिताबाईंना मिळाला. भ्रष्टाचाराचा हा क्रूर चेहरा प्रसाद यांनी पाहिला. धनादेश मिळाल्यावर दारात पैसे मागणार्‍यांची गर्दी झाली. आत्महत्या करण्यापूर्वी तुझ्या नवर्‍याने आमच्याकडून कर्ज घेतलेले, असे भांडत सांगणारे लोक पाहून संगिताबाईंना कळेचना काय करावे? शेवटी एक लाख रुपये कर्जवारी गेले. प्रसादला जवळ घेऊन संगिताबाई म्हणाल्या, “लेकरा, सारी दुनिया दूर केली, तरी मी आहे वाघासारखी. तू शिक, घरची काळजी करू नकोस.” पण, त्यावेळी संगिताबाईंची स्थिती पाहून प्रसाद यांनीही आत्महत्या करण्याचा विचार केला. पण, मनात विचार आला, आत्महत्या केली तर आई एकटी होईल.


मी खूप शिकीन, आपल्यासारखी तालुक्यात शेकडो मुलं आहेत, ज्यांच्या बाबांनी आत्महत्या केली. त्यांच्यासाठी काम करीन. या एका ध्येयासाठी प्रसाद यांनी शिक्षणाचा वसा घेतला, आर्थिक चणचणीमुळे शिक्षण सुलभ नव्हतेच. त्यासाठी ते अर्धवेळ नोकरी करू लागले. ‘एमएसडब्ल्यू’पर्यंचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीही मिळाली. या काळात ते आत्महत्या केलेल्या शेेतकर्‍यांच्या कुटुंबाला मदत करू लागले, त्या अनुषंगाने इतर अनेक सामाजिक प्रश्न सोडवू लागले. पण, नोकरी करत असल्यामुळे समाजकार्यासाठी पूर्ण वेळ देता येत नसे, एखाद्याला दवाखान्यात नेत असताना किंवा एखाद्या मुलाचे अ‍ॅडमिशन करून देताना वेळ जात असे, मग नोकरीच्या ठिकाणी वेळेवर जाणे शक्य होत नसे. यामुळे त्यांना नोकर्‍या सोडाव्या लागल्या, मग मात्र त्यांनी ठरवले की, आपण नोकरी न करता अर्धवेळ व्यवसायच करावा. ते रिक्षा चालवू लागले. हेतू हा की, संध्याकाळी रिक्षा चालवायची आणि इतर वेळी गरजूंना मदत. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांना चांगले वातावरण, निवास, अन्न मिळावे म्हणून त्यांनी आईच्या संमतीने आपली पाच एकर जमीनही विकली. त्या जमिनीतून शेतकर्‍यांच्या मुलांसाठी वसतिगृह उभारले. प्रसाद आणि त्यांची पत्नी अनू दोघेही या वसतिगृहातील मुलाबाळांचे मायबाप झाले आहेत. प्रसाद यांचे जीवनचरित्र खरोखरच प्रेरणादायी आहे. प्रसाद म्हणतात, “शेतकर्‍यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांगणे गरजेचे आहे की,
आत्महत्या नाही तर जगणे महत्त्वाचे. त्यासाठी आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये
स्वतःचा विकास करा. तुम्ही एकटे नाही. सगळा समाज तुमच्यासोबत आहे.”
Powered By Sangraha 9.0