केडीएमटीच्या बस भंगारात काढण्याच्या मुद्यावरशिवसेनेत एकमताचा अभाव : भाजपचे समर्थन

09 Nov 2020 18:39:20

KDMC_1  H x W:
 
 


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील ६९ बसेस भंगारात काढण्याचा ठराव आजच्या महासभेत मंजूरासाठी मांडण्यात आला. तेव्हा सत्ताधारी शिवसेना नगरसेवकांमध्ये एकमताचा अभाव आढळून आला. त्यामुळे शिवसेनेत बस भंगारात काढण्यावरुन दुफळी असल्याचे दर्शन शेवटच्या महासभेत घडले. शिवसेनेतील ही दुफळी पाहता भाजपने या विषयाला समर्थन दिले आहे.
 
 
 
69 बसेस भंगारात काढण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांच्या कालावधीत महासभेत मांडला होता. मात्र त्यावेळी या बसेस भंगारात काढण्यासाठी शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे व सचिन बासरे यांनी जोरदार विरोध केल्याने या विषयाला स्थगिती दिली होती. हा विषय तेव्हापासून स्थगित होता. त्यानंतर एक समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने पाहणी करुन एक अहवाल दिला होता. समितीच्या मते या बसेस दुरुस्ती करण्याजोग्या आहेत. मात्र त्याचा विचार झाला नाही. आज पुन्हा हा विषय मंजूरासाठी मांडला गेला असता शिवसेनेचे नगरसेवक वामन म्हात्रे यांनी केडीएमटीचे खाजगीकरण करा. शिवसेना नगरसेवक श्रेयस समेळ यांनी बसेस दुरुस्ती करा. तसेच कंत्रटी पद्धतीने कामगार भरती करा. कारण महापालिकेत विविध कामे कंत्रटी पद्धतीने केली जातात. त्यावर बसेस भंगारात काढू नका या मुद्यावर सचिन व सुधीर बासरे हे ठाम होते.
 
 
 
शिवसेनेचे सभागृह नेते प्रकाश पेणकर यांनी या बसेस भंगारात काढा यावर ठाम होते. शिवसेनेच्या नगरसेवकात एकमत होत नसल्याने हा विषय मताला टाकण्याची मागणी नगरसेवक बासरे यांनी केली. त्यावर भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते राहूल दामले यांनी शिवसेनेतील दुफळी पाहून या विषयाला भाजपचे समर्थन असल्याचे सांगून या बसेस भंगारात काढण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सचिव संजय जाधव यांनी आवाजी मतदान घेतले. मात्र शिवसेनेच्या सदस्यांनी एकच गोष्ट वारंवार नमूद केली. या सभेला शिवसेनेचा गट नेता नाही.



कारण शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांचे कोरोना काळात कोरोनामुळे निधन झाले. महापालिकेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने नव्या नेत्याची नियुक्ती केली नाही. शिवसेना गटनेता नसताना ही सभा घेतली जात होती. यावर लक्ष वेधले. मात्र सचिवांनी त्यांच्या मुद्याकडे दुर्लक्ष केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बसेस भंगारात काढणो कसे काय उचीत आहे याचा खुलासा केला होता. मात्र नगरसेवकांनी चर्चा करुन या ठरावावर खल करणो पसंत केले. मतदानानंतर या बसेस भंगारात काढण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे.





Powered By Sangraha 9.0