जयपूर : अजमेर एलिव्हेटेड रोडवर शुक्रवारी सकाळी आठ वाजता दोन मुली शंभर किमी प्रतितास वेगाने आउडी कार चालवत होत्या. वेगावर नियंत्रण न राहिल्याने त्यांनी एका तरुणाला धडक दिली. हा तरुण ३० फूट हवेत उडाला. जवळच्या एका घराच्या छतावर जाऊन पडला. त्याचा एक हात आणि पाय तुटून शरीरापासून वेगळा झाला होता. या भयानक घटनेनंतर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. ही दुर्घटना नसून हत्याच आहे, असाही संतत्प आवाज अनेकांनी उठवला आहे. वेगाचा थरार अनुभवण्याच्या नादात हा प्रकार घडला.
पोलीस भरतीसाठी आला होता तरुण
मृत तरुणाचे नाव मादाराम असून तो पोलीस भरतीसाठी जयपूरमध्ये आला होता. परीक्षा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता होती. युवक मिशन कम्पाऊंडमध्ये अजमेर रोडवर एलिव्हेटेड रोडवरून जात होता. परीक्षेपूर्वी एक तास आधीच रस्त्यात या घटनेमुळे त्याचा मृत्यू झाला आहे.
सोनी रुग्णालयाच्या मालकाच्या नावे आहे कार
एअर बॅग उघडल्याने या दोन्ही मुलींचा जीव वाचला. कारमध्ये अडकल्यानंतर काही वेळात त्या बाहेर आल्या. कार चालवणाऱ्या मुलीचे नाव नेहा सोनी, असे आहे. सोबत असलेल्या मुलीचे नाव प्रज्ञा असे आहे, सोनी रुग्णालयाच्या मालकांच्या नावावर ही कार नोंदवलेली आहे. कारचा नंबर RJ14 UN 5566 आहे. प्रज्ञाची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. कारची धडक इतकी जबरदस्त होती की बाजूला असलेला विजेचा खांब उन्मळून रस्त्यावर पडला होता. सुदैवाने रस्त्यावर कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.