शालेय दिवाळीच्या सुट्टीत वाढ; उद्यापासून १४ दिवसांची सुट्टी

06 Nov 2020 18:05:14


online schools_1 &nb


मुंबई :
विद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीनुसार अखेर राज्य सरकारने राज्यातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाढ केली आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ०७ नोव्हेंबर २०२० ते २० नोव्हेंबर २०२०पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ५ नोव्हेंबर २०२०च्या परिपत्रकानुसार १२ नोव्हेंबर २०२० ते १६ नोव्हेंबर २०२० अशी केवळ पाच दिवसांचीच दिवाळीची सुट्टी होती. यावरून विद्यार्थी व शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ही सुट्टी नऊ दिवसांनी वाढल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गही खुश आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अव्याहतपणे अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत गुंतले आहेत. दर वर्षी दिवाळीची सुट्टी २१ दिवसांची असते, परंतु यंदा कोरोनामुळे शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीच्या सुट्टीला कात्री लागली. माध्यमिक शाळा संहिता नियमानुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत. तसेच एकूण कामाचे दिवस २३० दिवस होणे आवश्यक होईल. इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २०० व इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांच्या कामाचे दिवस किमान २२० होणे आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0