तर,आम्ही कांदे-बटाटे तरी विकले असते - फटाके विक्रेत्यांची खंत

06 Nov 2020 21:07:01

fire crackers_1 &nbs
ठाणे : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या आघाडी सरकारच्या लेटलतिफ निर्णयाची खिल्ली फटाके विक्रेत्यांनी उडवली आहे.दिवाळीसाठी जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात फटाक्यांची ऑर्डर वगैरे तजवीज केलेली असते.तेव्हा,आता दिवाळीच्या तोंडावर अचानक फटाके विक्रीवर निर्बंध घालणे अनाकलनीय असुन या व्यवसायावर अवलंबुन असलेले छोटे-मोठे हजारो व्यापारी व कामगारवर्ग बेरोजगारीच्या खाईत लोटला जाणार आहे.सरकारने हा निर्णय काही महिने आधी घ्यायला हवा होता.निदान आम्ही कांदे-बटाटे तरी विकले असते.सध्या कांद्याला फटाक्यांपेक्षा चढा भाव मिळतोय.अशी खंत ठाण्यातील फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित,फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.तर,फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाला त्रास होत असल्याने खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने फटाके न वाजवता दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केल्याने आपसुकच फटाके विक्रीवर रोक आली आहे.याबाबत फटाके विक्रेत्यांना छेडले असता,विक्रेत्यांनी नाराजी दर्शवली.आधीच कोरोनामुळे अनेक महिने बेरोजगारीत गेले,अन आता अशी बंदी लादल्यास या व्यवसायात गुंतलेल्यांवर उपासमारीची वेळ येईल.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बनवलेले फटाकेच आम्ही विक्री करतो.यासाठी काही महिने आधी म्हणजेच जानेवारी - फेब्रुवारी मध्ये फटाक्यांची तजविज करतो.तेव्हा,आधीच निर्णय घेतला असता तर,आम्ही कांदे-बटाटे तरी विकले असते.कारण सध्या कांदा चांगलाच वधारला आहे.अशी खंत फटाके विक्रेते व्यक्त करीत आहेत.
 
ठाणे मनपा प्रशासनाचाही फतवा...
 
फटाके वाजवल्याने हवा आणि वातावरण दूषित होते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होते.फटाकेनिर्मितीत वापरलेल्या रसायनांमुळे श्वसनाचे अनेक गंभीर आजार उदभवतात. कोरोना झालेल्या रुग्णांना तसेच बरे झालेल्या व्यक्तींनादेखील दिवाळीत होणाऱ्या हवा प्रदूषणाचा त्रास मोठ्या प्रमाणात होवू शकतो.त्यामुळे यंदाची दिवाळी ध्वनिप्रदूषण विरहित, फटाकेमुक्त साजरी करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0