अभिमानास्पद ! मराठमोळे श्री ठाणेदार मिशिगनचे नवे लोकप्रतिनिधी

05 Nov 2020 19:11:00
 
Shree Thanedar_1 &nb
नवी दिल्ली : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी झालेल्या निवडणुकीत मराठमोळ्या उमेदवाराने इतिहास रचला आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी ९३ टक्के मतांसह विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडवला आहे.
 
 
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचले असतानाच मराठीजणांची मान अभिमानाने उंचावणारी बातमी समोर आली. आणि महाराष्ट्राच्या शिरोपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ६५ वर्षीय श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवला आहे. एकूण मतांपैकी ९३ टक्के मतदारांचा कौल मिळवत सहा विरोधकांचा पराभव केला. वैज्ञानिक असलेल्या श्री ठाणेदार यांचे उद्योग जगतातही मोठं नाव आहे. २०१८मध्ये श्री ठाणेदार यांनी गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत नशीब आजमावले होते. ‘श्री फॉर व्ही’ हे त्यांचे कॅम्पेन टीव्हीवर गाजले होते.
 
 
यंदा ते पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. कोरोनाच्या काळातही त्यांनी सॅनिटायझर, मास्क यांचे वाटप करुन मिशिगनमधील जनतेला आधार दिला. गरीबी, गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न सोडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. डेमोक्रेटिक पक्षातील भारतीय वंशाचे आणखी चार उमेदवार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठी पुन्हा निवडून आले आहेत. अॅमी बेरा, प्रमिला जयापाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती अशी या विजयी उमेदवारांची नावे आहेत. विशेष म्हणजे राजा कृष्णमूर्ती यांनी या चारही उमेदवारांना ‘समोसा कॉकस’ असे नाव दिले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0