ठाकरे-पवार सरकारला दणका : अर्णबची पोलीस कोठडी कोर्टाने नाकारली

05 Nov 2020 04:24:45


qt_1  H x W: 0


अलिबाग : अन्वय नाईक या कथित आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटकेनंतर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावण्यात आली. अर्णब गोस्वामींना 'पोलीस कोठडी' ऐवजी 'न्यायालयीन कोठडी' देण्यात आली आहे.


अन्वय नाईक यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र अन्वय नाईक मृत्यूप्रकरणात पुराव्याअभावी तत्कालीन सरकारने तपास बंद करण्याचा निर्णय करून न्यायालयात अहवाल सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल स्वीकारला होता. सातत्याने ठाकरे सरकारवर आसूडप्रहार करणाऱ्या अर्णब गोस्वामी यांना मोठ्या फौजफाट्यासह बुधवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कायद्यानुसार पोलिसांनी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर केले. अर्णबची चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. पोलिसांना तपास करण्यासाठी न्यायालयाला विनंती करून पोलीस कोठडी मागून घ्यावी लागते. पोलिसांची विनंती नाकारून अर्णब यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांना कोर्टाच्या पहिल्याच पायरीवर मोठी चपराक बसली आहे. तसेच न्यायालयात तपास बंद करण्याविषयीचा अहवाल सादर केलेला असताना, परस्पर तपासप्रक्रिया कशी सुरू करण्यात आली, असा प्रश्न सुनावणीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे.

गुन्हा रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समजते. त्याविषयी सुनावणी गुरुवारी होईल. तसेच न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे आता जामिनासाठी अर्ज करण्याचा अर्णब यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात काय होते, हे याप्रकरणी निर्णायक ठरेल. तसेच जामीन अर्जावर सुनावणी होऊन अर्णब गोस्वामी यांचा जामीन मंजूर होतो का, हे देखील आपल्याला गुरुवारी समजेल.
Powered By Sangraha 9.0