मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी अटक केली आहे.यावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेत राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.देशभरातून अर्णब गोस्वामींच्या अटकेचा निषेध व्यक्त होत आहे. 'इंदिराजी गांधी यांच्या काँग्रेसने लादलेल्या आणिबाणीची शिवसेना त्यावेळी "समर्थक" होती...आज सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या आणिबाणीची शिवसेना "व्यवस्थापक" झालेय!' अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
या घटनेचा निषेध करत भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणतात, तर एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली, सरकार विरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले. आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या... वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस. महाराष्ट्र आणीबाणीच्या दिशेने? असा सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारला विचारला आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला. पुढे ते म्हणतात, "इंदिराजी गांधी यांच्या काँग्रेसने लादलेल्या आणिबाणीची शिवसेना त्यावेळी "समर्थक" होती...आज सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या आणिबाणीची शिवसेना "व्यवस्थापक" झालेय!." यावेळी ते म्हणाले,नाईक परिवाराला न्याय मिळायलाच हवा...मात्र घटनाचक्र असे सांगतेय की, आपण केलेल्या कु-कृत्याला झाकण्यासाठी ठाकरे सरकार सुडबुध्दीने अर्णब गोस्वामी यांच्यावर कारवाई करतेय! श्री अर्नब गोस्वामी यांच्यावर झालेली कारवाई आणि त्यापुर्वीचे सगळे घटनाक्रम असे संकेत देतात की, हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर आम्हाला अडचणीत आणणारे प्रश्न विचाराल तर ठोकून काढू अशा पद्धतीने ठाकरे सरकार वागतेय!"
तसेच कायदेशीररित्या बंद झालेल्या केस उघडायच्या झाल्यास ठाण्यातील आत्महत्या केलेल्या बिल्डरची डायरी पण उघडावी लागेल! अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आझाद काश्मीरचा बोर्ड घेऊन गेट वे आँफ इंडियाला उभा राहणाऱ्या मेहक प्रभूवर कारवाई होत नाही पण त्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, असे संकेत राज्य सरकार देतेय! असा आरोपही शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे : भाजप आमदार अतुल भातखळकर
भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात आणीबाणी असल्याचे सुप्रिया सुळे काल म्हणाल्या. ही आणीबाणी खरेतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या सूडबुद्धी कारभारामुळे सुरू आहे. अर्णब गोस्वामींना झालेली अटक ही लोकशाहीला काळिमा फासणारी घटना आहे. यापुढे भकास आघाडीने लोकशाहीच्या गप्पा मारू नये. धिक्कार या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.