प्रात:सायं... नमन तुला देवा!

04 Nov 2020 19:56:09

Vedamrut_1  H x
 
आम्ही सर्वांनी सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेत त्या कालनिर्मात्या भगवंताचे श्रद्धेने स्मरण करीत, त्याची मनोभावे उपासना करावी. आपल्या दैनंदिन जीवनातील सकाळचा व रात्रीचा थोडासा तरी वेळ परमेश्वराच्या ध्यानासाठी काढावयास हवा.
 
 
उप त्वाग्ने दिवे दिवे
दोषावस्तर्धिया वयम्।
नमो भरन्त एमसि॥ (यजुर्वेद ३/२२)
 
 
अन्वयार्थ
 
 
(अग्ने!) हे अग्निस्वरूप परमेश्वरा, (वयम्) आम्ही (दिवे दिवे) दररोज (दोषा:) रात्री, सायंकाळी आणि (वस्त:) दिवसा, प्रभात काळी (धिया) बुद्धी व कर्मांची (नमः) नमस्कारयुक्त भेट (भरन्त:) अर्पण करीत (त्वा) तुझ्या जवळ (एमसि) येत आहोत. तुझी उपासना करीत आहोत.
 
 
विवेचन
 
 
अगदी अनादी काळापासून दिवसरात्रीचा क्रम सुरू आहे, तोदेखील अखंडितपणे! रात्रीमागून येणारा दिवस आणि दिवसामागून येणारी रात्र, असे हे अहर्निशाचे चक्र आम्हां सर्व जीवात्म्यांना प्रगतीची नवी दिशा देणारे आहे. दररोज सूर्योदयाच्या माध्यमाने उगवणारा नवा दिवस आणि दररोज सूर्यास्ताच्या रुपाने येणारी नवी रात्र ही आम्हांसाठी एक प्रकारे चैतन्याचा वाहणारा खळाळता झराच होय. दिवसभर आम्ही आमच्या कामात व्यस्त असतो. शरीर, मन, बुद्धी व इंद्रिये यांना आम्ही दिवसभर कामाला लावतो. त्यांच्या माध्यमाने चांगली आणि वाईट कामे ही करवून घेतो. दिवसभर आमची अशीही भटकंती सुरूच असते. पाहता-पाहता वेगवेगळ्या कामांनी दिवस संपून जातो आणि संध्याकाळ होऊन रात्रीला सुरुवात होते. रात्र तर कुठे थांबते? तीसुद्धा पाहता-पाहता झोपेत निघून जाते. म्हणूनच तिला ‘यामिनी’ असे म्हणतात. कारण, ती येते आणि केव्हा संपून जाते, याचा थांगपत्ताच लागत नाही. असे असले तरी शरीर, मन आणि इंद्रियांच्या विश्रांतीची वेळ म्हणजेच रात्र! दिवसभराचा थकवा घालविण्यासाठी रात्र ही भगवंताने जीवात्म्यांकरिता दिलेली अमूल्य अशी देणगी होय! त्यामुळेच तर मानवांसह सर्व पशु-पक्षी, जीवजंतू दिवसभराचा क्षीण नाहीसा करण्यासाठी रात्री विश्रांती घेतात. दिवस आणि रात्रीच्या या चक्राप्रमाणे आमच्याही जीवनाचे चक्र गतिमान आहे. किती दिवस संपले आणि किती रात्री व्यतीत झाल्या, याचा अंदाज बांधता येत नाही. पाहता-पाहता कितीतरी तास, कितीतरी दिवस महिने, वर्ष... इतका मोठा काळ निघून गेला? याचे आम्हाला भान राहिले नाही. यासाठीच भर्तृहरी म्हणतात - ‘कालो न यात: वयमेव याता:!’
 
 
 
सदरील मंत्रात आम्ही सर्वांनी सकाळी व संध्याकाळी अशा दोन्ही वेळेत त्या कालनिर्मात्या भगवंताचे श्रद्धेने स्मरण करीत, त्याची मनोभावे उपासना करावी. आपल्या दैनंदिन जीवनातील सकाळचा व रात्रीचा थोडासा तरी वेळ परमेश्वराच्या ध्यानासाठी काढावयास हवा. निर्मळ अंत:करणाने नमस्काराची भेटरूप कृतांजली त्याच्या चरणी अर्पण करावी, असा संकेत केला आहे. खरेतर भगवंताची उपासना किंवा त्याचे स्मरण हे सदोदित व्हावयास हवे. क्षणोक्षणी आपले प्रत्येक शुभकार्य त्या महान जगदीश्वराला साक्षी मानून करीत राहिल्यास माणूस कधीही दुःखी होत नाही. तो सतत सद्विचार व आत्मविश्वासाने जागृत राहतो. पण, व्यस्त जीवनामुळे किंवा कार्याधिक्यामुळे नेहमीच शक्य न झाल्यास किमान सकाळी आणि संध्याकाळी या दोन वेळा तरी परमेश्वराचे सान्निध्य प्राप्त करीत त्याची उपासना करावयास हवी. रोजचीच सांसारिक कामे, देवाणघेवाण, आपली दैनंदिन कामे आणि दिवसभराची व्यस्तता या सर्वांमधून वेळ काढून सकाळच्या मंगलप्रसंगी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी शुद्ध अंत:करणाने आणि कृतज्ञ भावनेने श्रद्धेने त्या प्रभू भगवंतासमोर प्रत्येकाने नतमस्तक झाले पाहिजे. यासाठीच वैदिक संस्कृतीत पंचमहायज्ञांपैकी संध्या हे पहिला महायज्ञ अतिशय महत्त्वाचा मानला आहे. इहलोकीची माया मोहाने ग्रासलेली कामे आणि शरीर, मन व इंद्रियांच्या विषयांना विसरून परमेश्वराच्या सान्निध्यात तल्लीन होणे, त्याला श्रद्धेने नमस्कार करणे किंवा त्याच्या प्रती कृतज्ञता अभिव्यक्त करणे, हे प्रत्येक जीवात्म्याचे कर्तव्य आहे.
 
 
प्रात: सायं केवळ शरीरानीच नव्हे, तर शुद्ध मनाने, पवित्र बुद्धीने व निर्मळ अंत:करणाने या चराचरात भरून उरलेल्या त्या महान सर्वव्यापक अशा सच्चिदानंदस्वरूपी परम ईश्वरासमोर बुद्धी व सत्कर्मपूर्वक नतमस्तक होणे इष्ट आहे. कारण, भक्ती किंवा उपासना ही जर विचार व बुद्धीपूर्वक केली गेली नाही, तर ती व्यर्थ ठरते. म्हणूनच ‘वयं धिया नमो भरन्त एमसि..!’ हा मंत्रोपदेश त्यासोबतच सत्कर्माचीदेखील जोड हवी. म्हणूनच कर्मयोग व ज्ञानयोग यांच्या माध्यमाने भक्तियोगदेखील सिद्ध होतो. अनेक भक्तगण उपासना तर करतात, पण त्यात बुद्धीचा व सत्कर्मांचा वापर नसतो. म्हणूनच ती अंधश्रद्धा ठरते. पूजापाठाच्या बाह्य देखाव्याला ‘भक्ती’ किंवा ‘उपासना’ म्हटली जात नाही. त्यासाठी अंतर्मुख व्हावे त्या भगवंताची संध्या म्हणजे सम्यक् ध्यान करावयास हवे! सृष्टीच्या सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल वस्तू व पदार्थांमध्ये भरून उरलेल्या त्या महान व सर्वशक्तिमान, निराकार अशा भगवंताच्या गुण, कर्म, स्वभावाचे चिंतन म्हणजेच संध्या! याचकरिता प्राचीन ऋषिमुनींनी काहीं वेदमंत्रांचे सूत्रबद्ध व सुव्यवस्थित असे संकलन केले आहे. अशा मंत्रांचे अर्थपूर्ण ध्यान करणे म्हणजेच संध्या! यातच ’ओ3म’ या प्रणव नामाचा अर्थपूर्ण जप किंवा गायत्री मंत्रासह परमेश्वराचे ध्यान याचाही अंतर्भाव होतो. अशा प्रकारे जो भक्त दररोज सकाळी परमेश्वराचे ध्यान करतो, त्याचा दिवस अतिशय उत्साहवर्धक समाधानकारक व आनंदी जातो आणि जो सायंकाळच्या वेळेस परमेश्वरासमोर नतमस्तक होतो, त्याची रात्रदेखील उत्तम प्रकारे व्यतीत होते. अर्थातच, हे नमन भगवंताला प्रसन्न करण्यासाठी नव्हे, तर त्याच्या प्रती कृतज्ञता किंवा धन्यवाद प्रकट करण्यासाठी आहे. यामुळे जीवनात मानसिक शक्ती व आत्मिक बळ वृद्धिंगत होते आणि जीवन सर्वस्वी यशस्वी ठरते. अशाप्रकारे या दोन्ही मांगलिक प्रसंगी त्या जगदीश्वराची मनोभावे भक्ती उपासना आणि ध्यान केल्यास उपासकाची जीवन सर्वस्वी सुखी, समृद्ध व यशस्वी ठरते. आजकालच्या धावत्या युगात माणूस धनार्जन व स्वार्थाच्या जंजाळात इतका गुंतला आहे की, त्याला आपल्या व्यस्त जीवनासमोर विश्वनिर्मात्या परमेश्वराची आठवण करण्यासही वेळ मिळत नाही! म्हणूनच प्रचंड प्रमाणात संपत्ती मिळवूनही तो शाश्वत सुख, आत्मिक समाधान व मानसिक शांती हरवून बसला आहे. कितीतरी दिवस आणि रात्री निघून गेल्या, पण त्याला भगवंतरूप खर्‍या माता-पित्याची आठवण येत नाही, यापेक्षा दुर्दैव कोणते? आता तरी त्याने जागे व्हावे. म्हणूनच ईशोपासनेला अंगीकार करण्यासाठी हा वेदोक्त मौलिक संदेश नवा दृष्टिकोन देणारा ठरतो.
 
 
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
 
 
Powered By Sangraha 9.0