जीना इसी का नाम है...

30 Nov 2020 20:10:49

Rahul Ballal_1  
 
 
टिळक बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय, रक्तपेढी विभाग येथे समाजविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राहुल बल्लाळ म्हणजे समाजातील युवकांसाठी आदर्श आहे. त्यांच्याविषयी...
 
 
 
‘किसी के मुस्कुराहटो
पे हो निसार
किसी का दर्द
मिल सके तो ले उधार
जीना इसी का नाम हैं।’
 
 
 
आयुष्याचे ध्येयच जेव्हा स्वार्थरहित सेवा आणि जनकल्याणाचा ध्यास होते, तेव्हा ते आयुष्य निःसंशय प्रचंड अनुभवातून तावून सुलाखून निघालेले असते. असे जरी असले तरी असे आयुष्य जगणारे लोक समाजासाठी दिशादर्शक आणि साहाय्यकारीच असतात, त्यापैकी एक राहुल बल्लाळ. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई (टीस) मधून समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले राहुल बल्लाळ. टिळक बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, रक्तपेढी विभाग येथे समाजविकास अधिकारी म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. सातारा येथील कुसावडे गावचे सुरेश बल्लाळ आणि माधुरी बल्लाळ कुटुंब. यांना दोन अपत्ये. त्यापैकी एक राहुल. बल्लाळांचे घर गावाकुसाबाहेर. जातीय विषमतेचे आणि त्याद्वारे आर्थिक विषमतेचे चटके नशिबाला पुजलेले. दोन वेळचे अन्न मिळणेही दुरापस्त. सुरेश बल्लाळ रोजंदारीची कामे करायचे, तर माधुरीबाई घरकाम करायच्या. या परिस्थितीमध्ये सुरेश आणि माधुरीबाई स्वाभिमानाने जगत. त्यांनी आपल्या मुलांना शिकविले की, “परिस्थिती कितीही कठोर असू दे, पण त्या परिस्थितीवर मात करायला हवी. समोर जर कुणी भुकेली व्यक्ती आली आणि ती भाकरी मिळविण्यास असमर्थ आहे, तर आपण कितीही भुकेले असू दे; पण त्या समोरच्याला भाकरी द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः त्याग करून आपल्या समाजाला माणूसपण दिलं. आपण पण माणुसकी जपली पाहिजे.” सुरेश आणि माधुरी मुलांना असे सांगून थांबत नसत, तर खरेच घरी कधीही कुणीही आले तरी सात तीळ वाटून खायचे हा संकल्प कायमच. माणुसकी, संवेदनशीलता, परोपकार, कष्ट अशा संस्कारात राहुल वाढत होते. अशातच एक घटना घडली, ज्याचा परिणाम राहुल यांच्या जीवनावर झाला.
 
राहुल यांच्या छोट्या काकांचा अचानक अपघात झाला. ते अपंग झाले. ज्यांचे हातावरचे पोट असते अशा कष्टकरी, गरीब घरात धट्टाकट्टा तरुण मुलगा अचानक अपंग झाल्यावर काय हलकल्लोळ माजेल, याबाबत विचार न केलेला बरा! तर काकांचा अपघात झाल्यावर, त्यांची स्थिती, समस्या, दुःख, परावशता राहुल यांनी जवळून पाहिली. त्यावेळी राहुल लहान होते. पण, काकांचे दुःख परिस्थिती पाहून त्याही वयात त्यांच्या मनात आले की, आज काका कुटुंबात राहतात. त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला, हवं नको पाहायला घरातले लोक आहेत. तरीही काकांना त्रास होतोच. मग असेही काही जण असतील, जे अपंग असतील आणि त्यांची देखभाल करायला कुणी नसतील, असेही असतील की, ज्यांना अपंगत्व आल्यावर मार्गदर्शन, साहाय्य करणारे कुणी नसेल, अशा बांधवांचे काय होत असेल? त्यांची परिस्थिती किती वाईट होत असेल? हाच विचार करून लहानपणीच राहुल यांनी ठरविले की, समाजातील गोरगरीब गरजूंसाठी काम करायचे. त्यासाठीच शिकायचे. थोडक्यात, आयुष्यभर जमेल तसे समाजकार्य करायचे हे त्यांनी ठरविले.
 
आयुष्याचे ध्येय ठरले होते. त्यामुळे राहुल यांनी खूप शिकायचे ठरविले. गावच्या जिल्हा परिषदेची शाळा, त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण आणि पुढे ‘बॅचलर ऑफ सोशल सर्व्हिस’चे शिक्षण गावातच घेतले. समाजसेवेचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईला यायचे ठरविले. त्यावेळी अनेक जण म्हणाले, “अरे, आपल्या गावकीची काम कमी आहेत का? इतका शिकलास इथंच नोकरी कर. अजून शिकून काय करणार? मुंबईत तुझा निभाव लागणार नाही भल्या माणसा.” तर शहरातल्या नातेवाईकांनीही आवर्जून सांगितले की, “आम्हीच इथे कसाबसा तग धरलाय. तू, अजिबात मुंबईला यायचा विचार करू नकोस.” पण, राहुल यांना ‘एमएसडब्ल्यू’ शिकायचेच होते. गावातले काही मित्र मुंबईत चेंबुरला राहायचे. छोटी-मोठी कामे करायचे. राहुल त्यांच्यासोबत राहू लागले. ‘टिस’ची प्रवेशपरीक्षा पास झाले. तिथेच वसतिगृहात त्यांना राहायलाही मिळाले. २०१० साल होते. त्यांना ७०० रुपये शिष्यवृत्ती मिळायची. राहुल त्या ७०० रुपयांत पूर्ण महिना चालवायचे. दिवस हलाखीचे होते. पण, मनातलं आशेचे पाखरू मरत नव्हते. ‘अपना टाईम आयेगा’ सांगत होते. शिक्षण पूर्ण झाले. मुंबईतल्या अनेक छोट्या-मोठ्या स्वयंसेवी संस्थेत त्यांनी काम सुरू केले. इथे समाजकार्य करणाऱ्यांचा भलामोठा गोतावळाच जमवला. मे २०२० मध्ये सायन हॉस्पिटलला समाजविकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. आयुष्याच्या ध्येयाची एक पायरी चढली गेली. कोरोना काळात हॉस्पिटलमधले वातावरणच बदलले. रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता जाणवू लागली. अशावेळी राहुल यांनी वैयक्तिक संपर्कातून सहकाऱ्यांच्या मदतीने मे २०२० ते आजपर्यंत रक्तदान शिबीर आयोजित केले. त्याचा परिणाम असा झाला की, रक्तदात्यांची संख्या पुन्हा वाढली. कोरोनाकाळात ही खूप मोठी गोष्ट होती.
 
राहुल बल्लाळ म्हणतात, “आज मी जो आहे, तो केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी समाजासाठी किती त्याग केला, संघर्ष केला. पण, सारे केले केवळ समाजाला एकसंध ठेवण्यासाठी, समाजाचे कल्याण करण्यासाठी. मलाही वाटते की, मीही आयुष्यभर समाजासाठी कार्य करावे. जीना इसी का नाम हैं।”
 
 
 
Powered By Sangraha 9.0