चीनवरुन अलिबागमध्ये दाखल झाला 'ग्रेट नाॅट' पक्षी; ५,५०० किमीचे स्थलांतर

28 Nov 2020 18:56:33

bird _1  H x W:

पक्ष्यांचा पायाला 'कलर फ्लॅग'



मुंबई (अक्षय मांडवकर) - चीनमधील यलुजियांग प्रांतामधून 'मोठा जलरंक' म्हणजेच 'ग्रेट नाॅट' या पक्ष्याने महाराष्ट्राच्या आक्षी किनाऱ्यावर स्थलांतर केले आहे. यलुजियांगमध्ये पक्षी स्थलांतराच्या अभ्यासादरम्यान आॅगस्ट महिन्यात या पक्ष्याच्या पायाला 'कलर फ्लॅग' लावण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी हा पक्षी मुंबईतील पक्षीनिरीक्षकांना अलिबागमधील आक्षी किनाऱ्यावर आढळून आला. आकाशमार्गे सरळ दिशेने विचार केल्यास या इवल्याश्या पक्ष्याने जवळपास ५ हजार ५०० किमीचे स्थलांतर केले आहे.
 
 
bird _1  H x W:
 

राज्याच्या किनारपट्टीवर हिवाळ्यात स्थलांतर करणाऱ्या पाणपक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमधून निरनिराळ्या प्रजातींचे पाणपक्षी राज्यातील पाणथळींवर दाखल होत आहेत. अशाच प्रकारे एक 'ग्रेट नाॅट' पक्षी चीनवरुन महाराष्ट्रात आल्याची नोंद पक्षीनिरीक्षक अविनाश भगत यांनी केली आहे. ८ नोव्हेंबर रोजी भगत हे पक्षीनिरीक्षणासाठी अलिबागजवळील आक्षी किनाऱ्यावर गेले होते. त्यावेळी ११ 'ग्रेट नाॅट' पक्ष्याचा थवा त्यांना किनाऱ्यावर खाद्य शोधताना आढळला. या थव्याचे निरीक्षण करताना त्यातील एका पक्ष्याच्या पायाला 'कलर फ्लॅग' लावल्याचे दिसल्याने त्याची छायाचित्र टिपल्याची माहिती भगत यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी १४ 'ग्रेट नाॅट' पक्ष्याच्या थव्यांमध्ये हा पक्षी पुन्हा एकदा दिसल्याचे त्यांनी सांगितले.

 
 
 
 
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासासाठी पक्ष्यांच्या पायात गोलाकार लोखंडी कडीबरोबरच 'कलर फ्लॅग' लावण्यात येतात. प्रत्येक देशाने आंतरराष्ट्रीय नियमांना स्वीकारून त्यांच्या देशामधील पक्ष्यांच्या पायांना लावण्यात येणाऱ्या 'फ्लॅग'चा रंग ठरवलेला आहे. आक्षीमध्ये आढळलेल्या 'ग्रेट नाॅट'च्या पायात हिरवा आणि केशरी रंगाचा 'फ्लॅग' असल्याने पक्षी स्थलांतराच्या जगमान्य नियमांनुसार या पक्ष्याच्या पायाला चीनमधील यलुजियांग प्रातांमध्ये 'कलर फ्लॅग' लावल्याचे समोर आले. याविषयी सखोल माहिती काढल्यानंतर या पक्ष्याला पक्षीशास्त्रज्ञ बाय किंगक्वान यांनी २६ आॅगस्ट रोजी यलुजियांगमध्ये 'कलर फ्लॅग' लावल्याची माहिती समोर आल्याचे, भगत यांनी सांगितले.
 

पक्षी स्थलांतराचे एकूण आठ आकाशमार्ग आहेत. त्यामधील 'इस्ट एशिया-आॅस्ट्रेलेशिया' या आकाशमार्गावरुन हा पक्षी भारतात आल्याची माहिती 'बीएनएचएस'च्या शास्त्रज्ञ तुहिना कट्टी यांनी दिली. हे पक्षी आर्टिक भागात प्रजनन करतात आणि त्यांचे हिवाळी स्थलांतर आॅस्ट्रेलियापर्यंत होते. या पक्ष्यांना प्रजनन करण्याबरोबरच स्थलांतरदरम्यान थांबण्यासाठी आवश्यक असलेला अधिवास नष्ट होत आहेत. त्यामुळे या पक्ष्यांची संख्याही कमी झाली आहे. हा पक्षी साधारण १५० ते २०० ग्रॅम वजनाचा असतो.

 


Powered By Sangraha 9.0