
मुंबई : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दहावी – बारावी बोर्डाच्या ऑनलाईन परीक्षा घेणे कठीण असल्याचे म्हटले. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासंदर्भात उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव ठेवला होता परंतु दहावी- बारावीचे विषय खूप असतात तसेच भाषाही वेगवेगळ्या असतात त्यामुळे ते शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ९ वी ते १२ वीचे वर्ग २५ जिल्ह्यात सुरु झाले आहेत पण यंदाच्या दहावी – बारावीच्या परीक्षांबाबत मात्र विद्यार्थी , पालक प्रचंड संभ्रमात आहेत. कोरोनाकाळात ऑनलाईन शिक्षण घेणे हाच अनेकांसाठी मोठा प्रश्न होता. मग परीक्षासुद्धा ऑनलाईन पद्धतीने देण्यासंदर्भात विद्यार्थी आणि पालकांचे या बाबतीतले विचार जाणून घेणे देखील तेवढेच महत्वाचे असणार आहे. या सगळ्या बाबींमुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्य शिक्षण मंडळातील अधिकारी यांना परीक्षांचे नियोजन करताना विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या मतांचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल, हे मात्र खरे.
भविष्यकाळात जर संपूर्ण राज्यभरात शाळा सुरु झाल्या, तर विद्यार्थ्यांनी उपस्थित रहायचं की नाही, परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावी की नाही, त्यासाठी नियोजन कसं असेल अशा सगळ्या संभ्रमाच्या वातावरणात असताना सरकार आता विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत नक्की काय निर्णय घेईल हे येत्या काळात स्पष्ट होईलच. परिस्थितीनुसार दहावी -बारावीच्या परीक्षा कशा घ्यायच्या, याची चाचपणी तज्ञ व राज्यशिक्षण मंडळाकडून सुरु असल्याचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.