‘मिठी’ प्रदूषणमुक्तीसाठी हरित लवादाचा दट्ट्या - पालिकेला १० लाखांचा दंड

27 Nov 2020 16:53:50
river_1  H x W:
 
 

नियोजित वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक


मुंबई : मुंबईकरांना २००५ मध्ये तडाखा दिल्यानंतर मिठीच्या खोलीकरणासाठी आणि रुंदीकरणाच्या कामासाठी हजारो कोटी रुपये खर्च झाले. तरीही प्रदूषित राहिलेल्या मिठी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी हरित लवादाने प्रशासनावर दट्ट्या उगारला आहे. त्यामुळे आता चालढकल न करता दोन वर्षांत हे काम करणे पालिका प्रशासनाला भाग पडणार आहे. मिठी नदीच्या पात्रात जाणारे सांडपाणी व मैलापाणी अडवत नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचे पर्जन्य विभागातील अधिकार्‍याने सांगितले.
 
 
मिठी नदीला २६ जुलै, २००५ मध्ये महाभयंकर पूर येऊन मुंबईकरांची दैना उडल्यानंतर २००७ सालापासून मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सुरू आहे. नदीच्या बाजूने संरक्षक भिंत बांधून नदीत येणारे सांडपाणी अडविण्याचे काम सुरू आहे. मात्र, १३ वर्षांपासून हे काम सुरू असून, आतापर्यंत एक हजार ४०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोट्यवधी रुपये खर्च झाले तरीही काम अद्याप संपलेले नाही. आता पवई फिल्टर पाडा ते वांद्रे-कुर्ला संकुलातील एमटीएनएल कार्यालयापर्यंत नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे.
 
 
तसेच नदीच्या बाजूने सेवारस्ते बांधून नदीत येणारे सांडपाणी आणि मैलापाणी अडविण्यासाठी वाहिन्या टाकण्यात येणार आहे. दरम्यान, आता काही भागातील नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणासाठी महानगरपालिका ५६९ कोटी ५२ लाख रुपये खर्च करणार आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे काम टप्प्याटप्प्यांमध्ये सुरू आहे. तर रुंदीकरणाचे कामही चार टप्प्यांमध्ये होत आहे.
 
१० लाखांचा दंड
मिठी नदीचे प्रदूषण रोखण्यात महानगरपालिकेला अपयश आले असल्याने राष्ट्रीय हरित लवादाने महापालिकेला दरमहा दहा लाख रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची गरज निर्माण झाली आहे. यात नदीचे रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याबरोबरच नदीत येणारे सांडपाणी अडविण्यात येणार आहे. तसेच मैला आणि सांडपाणी वाहून नेण्यासाठी नदीच्या बाजूने वाहिन्या तयार करण्यात येणार आहेत.
Powered By Sangraha 9.0