मुंबईकरांचे १,६०० कोटी समुद्रात ?

25 Nov 2020 15:00:59

Ashish SHelar_1 &nbs
 



भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न



 
मुंबई : “खारे पाणी गोडे करण्याच्या नादात मुंबईकरांचे १,६०० कोटी रुपये समुद्रात का टाकताय,” असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. पाच वर्षांपूर्वी असाच प्रस्ताव आला होता. मात्र, तो महागडा असल्याने फेटाळण्यात आला होता. मात्र, पुन्हा तसाच प्रस्ताव आला आहे.



या नियोजित प्रकल्पाबाबत आशिष शेलार म्हणतात की, “समुद्राचे रोज २०० दशलक्ष लीटर पाणी गोडे करण्यासाठी १,६०० कोटींच्या प्रकल्पाची गरज आहे का, याबाबत आघाडी सरकार, मुंबई महापालिका यांनी पुनरावलोकन करावे. हा महागडा प्रकल्प न्याय्य आहे का, याचा अनेकदा विचार करावा,” असे शेलार म्हणाले. “जर १,६०० कोटींपैकी ४० टक्के खर्चात सध्याची गळती थांबली तर रोज २०० दशलक्ष लीटरच्या दुप्पट पाणी वाचेल,” असे शेलार म्हणाले.



“मुंबईचा दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. त्यापैकी गळतीमुळे रोज सुमारे ९०० दशलक्ष लीटर पाणी वाया जाते. पालिका आणि आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कमीत कमी दहा टक्के म्हणजे ३८० दशलक्ष लीटर पाण्याची गळती सहज थांबविता येते,” असेही शेलार म्हणाले.
 


शेलार असेही म्हणाले की, “‘एच/वेस्ट’ प्रभागात, माझ्या प्रयत्नांनी पायलट प्रोजेक्ट करून एका वर्षात गळतीने वाया जाणारे १०० कोटी लीटर पाणी वाचविले. पालिका २४ प्रभागांत असा प्रयत्न करून वाया जाणारे पाणी का वाचवत नाही? पालिकेला पाणीगळती थांबवायची नसेल तर मुंबईकरांचे १,६०० कोटी समुद्रात का टाकताय? हे सगळे कोणाच्या फायद्यासाठी चालले आहे,” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


Powered By Sangraha 9.0